Showing posts with label Nation. Show all posts
Showing posts with label Nation. Show all posts

Wednesday, 2 February 2011

जिवंत नागरीकांची प्रतिक्रिया अशीच असू शकते...

ट्युनेशिया, येमेन नंतर आता इजिप्तमधील जनतेने सरकारविरोधात उठाव केला आहे. या देशांमधील नागरीकांच्या एकीला खरे तर सलाम केले पाहिजे. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या हुस्नी मुबारक यांच्या विरोधातील बंड जवळजवळ यशस्वी झाल्यासारखेच आहे. कालच हुस्नी मुबारक यांनी यापुढील निवडणूकांमध्ये सहभाग न घेण्याचे जाहिर केले आहे. जनतेसमोर हे हुकूमशहा झुकत असताना आमच्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे बडविणा-या देशातील जनतेच्या मनातही असा विचार येत असेल का?

आपल्या देशात लोकशाही आहे, इथले सरकार हे लोकांनी निवडून दिलेय हे सत्य आहे. परंतु लोकांना त्यांचे अधिकार जाऊ द्या, साधे दोन वेळचे पोट भरण्याची सोय तरी आहे का? हिंदुस्थान हा देश गरीब नक्कीच नाही. २०२० मध्ये आपला देश जागतिक महासत्ता असणार आहे, आपली जीडीपी ग्रोथ सतत वाढत असल्याचे आपले पंतप्रधान सांगत असतात. जर पुढच्या ९ वर्षात आपण आर्थिक महासत्ता बनणार असू तर त्यात तळागाळातल्या गरीब जनता असेल की नाही?

जीडीपी ग्रोथ किंवा सरकार जे आता भरारीचे दाखले देतेय यातले देशातील सर्वसामान्य जनतेला काहिच कळत नाही. १२-१२ तास काम करुन महिना रू.२०००-५००० कमावणारी जनता आजच्या महागाईसमोर पार कोसळून गेलीय, कधी कांदा, कधी टॉमेटोचे भाव वाढतात. पेट्रोलचे भाव तर आमावस्या-पोर्णिमेला वाढत आहेत. तरी सरकारचे मंत्री महागाई असल्याचे मान्य करीत नाहीत.

आमच्या देशातील जनतेच्या हाती मताचे हत्यार असल्याचे लोकशाहीचे फाजिल लाड करणारे सांगत असतात, पण पाच वर्षे हालाखीचे काढून हत्यार उपसण्याची वेळ येते तेव्हाच आमचे चलाख मंत्री भ्रष्ट्राचाराचा पैसा जनतेमध्ये वाटून पुन्हा सत्ता बळकावतात. ज्यांनी प्रामाणिकपणे चिडून सरकारविरोधी मतदान केलेले असते ते केवळ कपाळाला हात लावल्यावाचून काहीच करु शकत नाहीत.

ट्युनेशिया, येमेन आणि इजिप्तसारखेच इथल्या जनतेने खरे तर आतापर्यंत पेटून उठायला हवे होते. पण तसे काही घडलेले नाही किंवा घडणार नाही अशी पक्की खात्री सरकारला आहे. गांधीजींच्या अहिंसेला कॉंग्रेसने कधीच मुठमाती दिलीय, पण जनतेने हमखास त्याच मार्गाने चालावे असे कॉंग्रेसवाल्यांना वाटते. हा देश अनेक क्रांतीकारकांच्या बलिदानाने स्वतंत्र झालाय हे जनतेला माहीत असावे. हे कॉंग्रेसचे सरकार गेल्याशिवाय सर्वसामान्यांना सुखाचे दिवस दिसणार नाहीत, हे सत्य आहे. नसेल पटत उदाहरण म्हणून देशातील कॉंग्रेसेतर राज्यांची प्रगती पहा!