Showing posts with label Mumbai. Show all posts
Showing posts with label Mumbai. Show all posts

Wednesday, 15 February 2012

आपले मतदान फक्त विकासकामांनाच.. शिवसेना आणि महायुतीलाच!


उद्या महाराष्ट्रातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूका होत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सरकारी आणि खाजगी कार्यालय बंद ठेवण्याचे आवाहन केलेले आहे त्यानुसार बहुतांश कार्यालये बंद राहणार आहेत पण ज्या मतदानासाठी ही कार्यालये बंद असणार आहेत त्यातले मतदार नक्की मतदानाला उतरतील का? हा मोठा प्रश्नच आहे.

निवडणूक म्हटले की प्रचारात शिमगाच असतो. एकमेकांची उणीधुनी काढण्याचे जोरदार कार्यक्रम मैदानात सुरु असतो तसाच तो फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर सुध्दा दिसत आहे. ओबामामुळे हल्ली आपल्या देशात इंटरनेट हे प्रचाराचे प्रमुख माध्यम बनायला लागले आहे. मागची अनेक वर्षे कुठेच न दिसणारे नेते आणि उमेदवार फेसबुकवर मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी इंटरनेटचा वापर करायला लागलेत. काही हवशे-गवशे-नवशे तर चक्क फेसबुकवर जाहिरीती देऊन आपला प्रचार करत होते. पण निवडणूका संपल्यावर हेच लोक त्याच जोशमध्ये मतदारांशी थेट संवाद साधायला उपलब्ध असतील का?

आपल्याकडील सुशिक्षीत मतदारांची ओरड असते विकासकामांवर निवडणूका लढविल्या गेल्या पाहिजेत, पण तसे एक उध्दवसाहेब ठाकरे सोडले तर कोणीही करताना दिसत नव्हते. शिवसेना मागची 15 वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आहे, खरं तर त्यांच्या विरोधकांनी विकासकामांवर निवडणूका लढविल्या पाहिजे होत्या पण तसे न होता शिवसेनेच्या करुन दाखवलं उपक्रमालाच विरोध करण्यात वेळ घालवून विरोधकांनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. शिवसेनेकडे महानगरपालिकेची सत्ता का येते यामागे नक्कीच विचार करण्यासारखी काही कारणं या करुन दाखवलं मध्ये नक्कीच आहेत.

मागच्या महिन्यात उध्दवसाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतील संयुक्त महाराष्ट्र दालन बघायला गेलो होतो. वाटलं होत शिवसेनेनं बनविले आहे म्हणजे त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी कुठेतरी शिवसेनेचा उल्लेख नक्कीच असले पाहिजे. पण एक उद्घाटनाची पाटी सोडली तर आत फक्त आणि फक्त संयुक्त महाराष्ट्राच्या रक्तरंजित इतिहासावरील शिल्पे, चित्र आणि माहिती वाचायला मिळाली. शिवसैनिक म्हणून एकवेळ विचार आला की प्रबोधनकर आणि बाळासाहेबांचे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात योगदान असतानाही शिवसेनेने त्याचा उहापोह या दालनात कुठेही केलेला नाही.  
अशाच प्रकारची अनेक कामे उध्दवसाहेबांनी करुन दाखवलं मध्ये फोटोसहित दिली आहेत. पण आपल्याकडील पक्के राजकारणी विरोधकांना मात्र यावर निट भाष्य करणं जमलेच नाही. मुंबईचा विकास होतोय ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. विरोधाला विरोध करण्यात विरोधी पक्षांचा नक्कीच फायदा आहे पण सर्वसामान्य माणसाला त्याचा काहीही फायदा नाही.

शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असताना मागची अनेक वर्षे कुठल्याही प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. मुंबईतील पाणी प्रश्नावर अनेक प्रकारचे आरोप शिवसेनेवर करण्यात आले परंतु मुंबईला मिळणारे पाणी हे धरणातून येणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहे हे सर्वसामान्य मुंबईकरांना नक्कीच माहित आहे. उध्दवसाहेबांनी मुंबईकरांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेतले आहे, भुमिगत बोगद्यांच्या माध्यमातून वेगाने पाणीपुरवठा व्हावा यावर काम सुरु आहे त्याचे फोटो मधल्या काळात वर्तमानपत्रात आलेले आहेत. बेस्ट बसेसमध्ये 25 रुपयात कुठेही प्रवास करण्याची मॅजिक पास योजना महानगर पालिकेच्या बेस्ट उपक्रमाचीच! याचा फायदा मागच्या काळात लाखो मुंबईकरांनी घेतलाय सध्या दिवसाच्या मॅजिक पासचे दर वाढले असले तरी मासिक पासमध्ये दिवसाला केवळ 18 रुपये मोजावे लागतात.

मुंबई महानगरपालिकेचे सर्वच प्रश्न सोडविण्यात शिवसेना यशस्वी झालीय असे उध्दवसाहेब ठाकरे कधीच म्हणत नाहीत. मुंबईत अजून अनेक कामे करायची आहेत, ती करण्यासाठी ज्यांनी यापूर्वी प्रयत्न केले आहेत त्यांच्यात हातात पुढील पाच वर्षे सत्ता दिल्यासच ती कामे योग्य रितीने मार्गी लागू शकतील. नाहीतर युती सत्ताकाळात महाराष्ट्रात झालेल्या विकासकामांची केवळ नावे बदलून श्रेय लाटण्याची कामे कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांकडून झाली तसेच मुंबईत घडायला नको.

मुंबईत मराठी माणसाचीच सत्ता राहिली पाहिजे कारण मुंबईवर आदळणाऱ्या परप्रांतिय लोंढ्यांमुळे मुंबईचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. मनसे सारखे पक्ष मराठी माणसाची मते मागताना शिवसेनेचा उमेदवार कसा पाडला जाईल यासाठी पुरेपुर प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांनाही जर कॉंग्रेस सत्तेत आली तर उभे राहणारे प्रश्नांची जाणिव असलीच पाहिजे, परंतु अल्पकाळातील फायद्यासाठी ते थेट मुंबई परप्रांतियांच्या घशात घालण्यासाठी शिवसेनेला विरोध करत आहेत.  मनसेच्या अनेक नेत्यांनी 30 च्या पुढे जागा येणार नाहीत याचा उल्लेख केलेला आहे. महानगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी किमान 115 नगरसेवकांची आवश्यकता असते. मग आपले मत मनसेला देऊन कुठल्या प्रकारचा बदल सर्वसामान्य मराठी माणसाच्या नशिबी येणार आहे?

मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग आणि राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांसारख्याच्या झोळीत आमच्या मुंबईतील मराठी मतदारांनी मुंबईला द्यायचे का? मनसे हेच काम करतेय म्हणजेच यांचे कुणाशी साटेलोटे आहे हेही स्पष्ट होतेय. म्हणून मतदारराजा, सावध रहा! कान आणि डोळे उघडे ठेवून मतदानाला बाहेर पड. शिवसेना आणि महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करून मराठी मुंबईच्या स्वप्नांना धुळीस मिळवू नको!

Saturday, 29 January 2011

‘व्हर्च्युअल क्लासरुम’ महानगरपालिकेचे प्रगतीचे पाऊल

या आठवड्यात शिवसेनेचे कार्यप्रमुख श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांनी ‘व्हर्च्युअल क्लासरुम’ या मुंबई महानगरपालिकेच्या योजनेचे उद्घाटन केले. मुंबई महानगरपालिकेच्या २४ शाळांमध्ये ही सुविधा सध्या उपलब्ध करुन देण्यात आलेली असून येत्या काही दिवसात १०० शाळांचा समावेश यात करण्यात येणार आहे.

‘व्हर्च्युअल क्लासरुम’ ही संकल्पना श्री. उद्धवसाहेबांची असून महानगर पालिका शाळांचा चेहरामोहरा मागच्या काही दिवसातून बदलत असताना खाजगी शाळांप्रमाणेच महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करता आले पाहिजे तसेच तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनाचा लाभ एकाच वेळेस अनेक विद्यार्थ्यांना झाले पाहिजे अशा मताच्या उध्दवसाहेबांची संकल्पना म्हणजेच महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी केलेला मोठा क्रांतिकारी बदल असेच म्हटले पाहिजे.

व्हर्च्युअल क्लासरुमच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या सर्व शाळांना जोडून सर्व विद्यार्थी एकाच वेळी तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन घेऊ शकतील तसेच मनातील प्रश्न त्या शिक्षकांना विचारुन शंकांचे निरसनसुद्धा करुन घेऊ शकतील.  व्हर्च्युअल क्लासरुम आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन महानगर पालिकेतील विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे शिक्षण देणारी मुंबई महानगर पालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. प्रत्येक शाळेला एक एलसीडी टिव्ही, वेब कॅमेरा आणि माईक देण्यात आला असून व्हर्च्युअल क्लासरुमचा मुख्य स्टुडिओ अंधेरीत व्हॅल्युएबल ग्रुपच्या कार्यालयात आहे. तेथून तज्ञ शिक्षक २४ शाळांमधील विद्यार्थ्यांना एकाच वेळी मार्गदर्शन करतात.

महानगर पालिकेच्या शाळांच्या शिकवण्याच्या पध्दतीमध्ये श्री. उद्धवसाहेबांनी अमुलाग्र बदल मागच्या काही काळात केलेले आहेत आणि त्याचा चांगला फायदा गरीब विद्यार्थ्यांना होत आहे. शिवसेनेच्या विकासाच्या कामांची अशी दखल खासकरून मिडीया का घेत नाही हा मोठा प्रश्न आहे. उद्धवसाहेबांच्या राजकिय प्रतिक्रियांसाठी धावपळ करणाऱ्या मिडीयाला महानगरपालिकेच्या शाळांत सुरु होणाऱ्या या अद्ययावत बदल दिसू नयेत हीच आपल्या लोकशाहीची दुर्दशा आहे म्हटले तरी हरकत नाही.

Sunday, 23 January 2011

महाराष्ट्राला बाळासाहेबांचेच नेतृत्व हवेय!


महाराष्ट्रात अनेक महान नेते होऊन गेले, ज्यांनी देशासाठी आपले आयुष्य पणाला लावले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखे नेते हे तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला शूर-वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध केले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच शिवरायांचे भक्त बनून अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार करताना इंग्रजी राजवटीला हलवून सोडले, त्याच शिवबाच्या मातीत त्याच शिवबाचा भक्त बनून आज जर कोणी महाराष्ट्राला किंबहुना मराठी माणसाला मान-सन्मानाने जगायला शिकवले असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनीच!


व्यंगचित्रकार एवढा मोठा नेता बनू शकतो हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असेल. इतर नेत्यांवर व्यंगात्मक कला चितारुन त्याच क्षेत्रात काम करणे हे फारच कठीण आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांच्यासारखे नेते भरात असताना त्यांच्यावर व्यंगचित्र काढणे हे सोप्पे नव्हते, पण शिवरायांच्या भूमीत जन्माला आलेला मराठी माणूसच हे करु शकतो हे बाळासाहेबांनी दाखवून दिले. ‘मार्मिक’ या व्यगंचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून ‘शिवसेना’ नावाची मर्दांची संघटना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केली. शिवसेनेचे वय आज ४५ वर्षे जरी असले आणि स्थापनेपासून काम करणारे शिवसैनिक हे कायम तरुणच असतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

४५ वर्षांपैकी जवळ जवळ ४० वर्षे सत्ता नसतानाही आक्रमक संघटना कशी टिकू शकते हे अनेकांना पडलेले कोडे आहे. तात्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनीही शिवसेना संपविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले असे आजही वाचनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी शिवसेना संपू शकली नाही याचा अर्थ यात कुठेतरी दैवी शक्ती असलीच पाहिजे असे मानले तरी हरकत नाही. आजही काहीजण शिवसेना संपविण्याची कोल्हेकुही करत असतात पण या चिटपाखरांना ४२ पिढ्याही शक्य होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे.

बाळासाहेबांनी शिवसेनेत नुसती माणसांची भरती केली नाही तर निष्ठावान मावळ्यांची फौज स्वत:च्या जादुई नेतृत्वाने उभी केली. बाळासाहेब वयाने थकले असले तरी त्यांची जादु आम्हा तरुणांवर कायम आहे. अनेकजणांना साहेबांची भाषण ऐकता आली नाहीत परंतु जे काही वाचून कळते त्यावरुन साहेबांचे मोल आम्हा तरुणांसाठी फार मोठे आहे. ‘जिथे पिकते, तिथे विकले जात नाही’ ही म्हण मराठी माणसासाठी चपखल लागू पडते. शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते दादोजी कोंडदेवांपर्यंत आपण इतिहास जगण्यापेक्षा त्यावर वादच करत बसलो. बाळासाहेबांसारखे आधुनिक आणि प्रगतीशिल नेतृत्व असतानाही आमच्या महाराष्ट्राने संधी दिली ती केवळ साडेचार वर्षासाठीच! त्याही साडेचार वर्ष मिळालेल्या संधीचे सोने करुन साहेबांनी अनेक विकासकामे करुन दाखविली. शिवशाही सरकारच्या कामांमध्ये प्रामुख्याने मुंबईतील ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वरळी सागरीसेतू ही कामे आहेतच, तसेच सर्वसामान्यापर्यंत सरकार पोहचले पाहिजे यासाठी अनेक सरकारी उपक्रम कोकणासारख्या मागासलेल्या भागात आणले. आजच्या तरुणाला प्रगती आणि विकास या दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात, बाळासाहेबांनी मुळात त्या शिवसेनेत यापूर्वीच राबविलेल्या आहेत. मुंबईमध्ये मागची अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर असल्याने सिद्ध करुन दाखविले आहे. महानगरपालिकेकडे असलेले मर्यादित अधिकार बघता देशातील इतर महानगरपालिकांमध्ये मुंबई कैक पट पुढे आहे.

बाळासाहेब हे तरुणांचे आदर्श नेते आहेत आणि कायमस्वरुपी राहणार आहेत. स्पष्ट बोलणारा माणूस राजकारणात स्वकर्तुत्वावर टिकू शकतो हे साहेबांनी दाखवून दिलेय पण त्यामुळे अनेकांची गोचीही झालेली आहे. बाळासाहेबांचेच जुने मित्र शरद पवार हे एकेकाळी साहेबांच्या स्पष्टवक्तेपणामुळे साहेबांपासून लांब गेले होते. अनेकजण साहेबांच्या याच स्वभावामुळे जवळ यायला तयार होत नाहीत. साहेबांनी शिवसैनिकांवर जेवढे प्रेम केले तेवढे कुणावरच केले नसेल. जगातील कुठल्याही पक्षातील कार्यकर्त्याला समाजात मान नसेल इतके मान शिवसैनिक म्हणून मिळते हा आम्हा शिवसैनिकांचा अनुभव आहे. पैसा-संपत्ती या मोहात न पडता केवळ मराठी अस्मितेचे जतन झाले पाहिजे यासाठी अनेक मोठ्या लोकांशी साहेबांनी पंगा घेतला. परंतु स्वत:च्या विचारांशी आजही कायम प्रामाणिक राहिले आहेत.

बाळासाहेबांसारखे नेतृत्व हे अनेक वर्षांनी जन्माला येते. बाळासाहेबांच्या भाषणाची नक्कल करुन, वेगळे दुकान मांडून, मराठी माणसाच्या विश्वासाचा वापर स्वत:चे पोट भरण्यासाठी केलेले काही स्वयंभू नेते साहेबांच्या कुटूंबातच जन्माला आले हे सर्वांचे दुर्भाग्य आहे. परंतु बाळासाहेबांनी दिलेला विचार आचरणात आणण्याचे काम केवळ शिवसैनिकालाच जमते. घरदार सोडून शिवसेनेसाठी झोकून देणारे शिवसैनिक साहेबांना मिळाले एवढे भाग्य लाभलेला नेता क्वचित असेल.

आज बाळासाहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अनेकजण लिखाण करत असतात, वर्तमानपत्रांमध्ये पुरवण्या निघतात. माझाही तसाच मोडक्या-तोडक्या भाषेतील हा लेख माझ्या ब्लॉगवर लिहित आहे. आमच्या साहेबांना अखंड निरोगी आयुष्य लाभो, ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Wednesday, 12 January 2011

डब्बेवाल्यांच्या नावाने पैसा खाणारा भुरटा चोर


माहिती तंत्रज्ञानाची भुरळ आज सर्वांनाच आहे. सोशल नेटवर्किंगमुळे जग खुपच छोटे झालेले आहे. माहितीचा खजिना एका क्लिकसरशी सर्वांसमोर खुला होत आहे. यातूनच काहींनी आपला धंदासुद्धा थाटला आहे. त्याद्वारे अमाप पैसा गोळा करण्याच्या मशिन तयार झाल्या आहेत. असेच काहीसे प्रकरण घडलेय ते मुंबईच्या प्रामाणिक डब्बेवाल्यांबरोबर!

डब्बेवाल्यांची किर्ती जगभरात पोहचत होती. जगातील सर्वात कुशल मॅनेजमेंट गुरु म्हणून डब्बेवाल्यांना प्रसिद्धी मिळत होती. याचाच फायदा घेऊन एक इंजिनीयर मनिष त्रिपाठी याने डब्बेवाल्यांसमोर वेबसाईटच्या माध्यमातून आपण करत असलेले काम जगभरात वेबसाईटच्या माध्यमातून पोहचवण्याची संकल्पना मांडली व मार्च २००६ मध्ये  www.mydabbawala.com नावाची वेबसाईट बनविली. जगभरातील दोन कोटी लोकांनी या वेबसाईटला भेट दिलेली असून डब्बेवाल्यांना मदत व्हावी या हेतूने लाखो रुपयांची देणगीसुद्धा दिलेली आहे.

दरम्यान मनिष त्रिपाठी डब्बेवाल्यांवर जगभरात डब्बेवाला या विषयावर व्याख्यान देत असे. डब्बेवाल्यांच्या हितासाठी काम करत असल्याचे तो सांगत होता. स्वत: डब्बे हातात घेऊन फोटो काढून विझिटींग कार्ड सुद्धा छापले होते. स्वत:च डब्बेवाला बनून जगभरात फिरुन जमा झालेली निधी स्वत:च्याच खिशात टाकण्याचे काम हा करीत असे. डब्बेवाल्यांच्या संघटनेने मनिष त्रिपाठीवर रितसर सायबर क्राईम पोलिसांमध्ये तक्रार केली असून पोलिसांनी या मनिष त्रिपाठी नावाच्या भुरट्या चोराला अटक केलेली आहे.