Showing posts with label Maharashtra. Show all posts
Showing posts with label Maharashtra. Show all posts

Tuesday, 7 August 2012

ST चे तिकीट ऑनलाईन बुक करा

गणपती बाप्पा जवळ येत आहेत. कोकणात जाण्यासाठी गणेशभक्तांना रेल्वे आणि एस.टी. बुकींगसाठी अक्षरशः तुटून पडावे लागते. परंतु आता तशी वेळ येण्याची शक्यता नाही. एस.टी.चे आरक्षण ऑनलाईन करण्याची सुविधा एस.टी. महामंडळाने पुरविली आहे. आपले ऑनलाईन तिकीट बुक करताना पैसे भरण्यासाठी आपल्याकडे क्रेडीट कार्ड, नेट बॅंकींग किंवा डेबिट कार्डचा वापर करता येतो.

जर का तिकीट बुक होताना काही अडचणी आल्या आणि आपल्या खात्यातून पैसे डेबिट झाले असतील तरी काळजी करू पुढील सात दिवसाचे आत एस.टी. महामंडळ आपले पैसे आपल्या खात्यात परत पाठवून देते. तेव्हा आता कुठल्याही कटकटीशिवाय इंटरनेटवरून आपले तिकीट बुक करुन घ्या.

तिकीट बुक करण्यासाठी पुढील लिंकवर जा https://public.msrtcors.com


Wednesday, 9 February 2011

मिडीयाला आत्मपरीक्षणाची गरज आहे

काही वर्षापासून मिडीया हा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेक घटनांची माहिती घरबसल्या मिळत असल्याने देशात वृत्तचित्र वाहिन्यांना लोकांनी डोक्यावर उचलून धरले. एका इंग्रजी चित्रपटात एक डायलॉग आहे, जेव्हा शक्ती मिळते, तेव्हा जबाबदारीही येते. आज आपल्याकडची मिडीया याच्या परस्परविरोधी वर्तन करताना दिसतेय. एखाद्या संघटनेला, व्यक्तीला किंवा समुहाला टारगेट करून बातम्या बनविणे हा यांचा धंदा बनलेला आहे. अर्थात चांगले पत्रकार नाहीतच असे मुळीच म्हणायचे नाही.

मिडीया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो पण ज्याप्रमाणे राजकारणी मोकाट सुटू लागले अगदी तशीच मिडीयासुध्दा आज मोकाट सुटलेली आहे. कधी, कुठे, काय दाखवायचे याचे भान नसलेले काही पत्रकार जेव्हा नैतिकतेची भाषा करतात तेव्हा हसावे की रडावे तेच कळत नाही.
हल्लीच अजीत पवार यांनी मिडीयासाठी दंडुक्याची भाषा केलीय. जनतेलाही तसेच वाटते की मिडीयावर कुणाचे तरी नियंत्रण असले पाहीजे. कुठल्याही सी ग्रेड चित्रपटाप्रमाणे काही दृष्ये दाखवताना हे कधीच काही विचर करत नाही का? की टीआरपी साठी हे आता काहीही करायला तयार आहेत? केवळ पैसा आणि टीआरपी याचसाठी असे सगळे चालणार असेल तर अजीत पवार चुकीचे बोलले असे मुळीच वाटत नाहीत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वत: एक पत्रकार असताना अनेकदा पत्रकारांवर तुटून पडतात, म्हणून जवळजवळ सर्वच चॅनेलनी शिवसेनेवर अघोषीत बहिष्कार टाकलेला आहे. शिवसेनेच्या चांगल्या गोष्टी नकारात्मक पध्दतीने दाखवून पत्रकार आपल्याच प्रोफेशनशी नकळत बेइमानी करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी शहिद उन्नीकृष्णनच्या काकांनी शहिदांना न्याय मिळत नाही म्हणून जाळून स्वत: ला जाळून घेतले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. ही खरं तर खुप मोठी घटना आहे. पण आमचे पत्रकारांना याबद्दल दखल घ्यावेसे वाटले नाही. एखादी मोठी घटना घडते आणि मिडीयामध्ये येत नाही तेव्हा लोकांनाही अशा घटना समजत नाहीत. याला जबाबदार कोण?

मिडीयाला बोलले किंवा हल्ला झाला की उगाच थिल्लर चाळे करण्यापेक्षा अशा घटना का घडतात हे एकदा मिडीयावाल्यांनीच तपासावे. इतरांना सल्ले देणे सोपे असते पण स्वत: आचरणात आणणे कठीण असते.

Tuesday, 8 February 2011

माघी गणेशोत्सव : छायाचित्र

आमच्या गावी म्हणजेच रानवली (श्रीवर्धन) येथे दरवर्षी माघी गणेशोत्सव अतिशय जल्लोषात साजरा केला जातो. परंतु या वर्षीचे प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे लिटील चॅम्प्स मुग्धा आणि रोहित. याच कार्यक्रमाचे छायाचित्र श्री. मंगेश निंबरे यांनी पाठविले तेच आज ब्लॉगवर ठेवत आहे.






Monday, 24 January 2011

पंडीत भिमसेन जोशी यांना आदरांजली

भारतरत्न स्वरभास्कर पंडीत भिमसेन जोशी यांचे आज पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात दिर्घ आजाराने निधन झाले. पंडीतजींचा जन्म ४ फेब्रुवारी १९२२ साली गदग, धारवाडमध्ये झाला होता.

पंडीतजींना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.

पंडीतजींना भावपूर्ण आदरांजली!

Sunday, 23 January 2011

महाराष्ट्राला बाळासाहेबांचेच नेतृत्व हवेय!


महाराष्ट्रात अनेक महान नेते होऊन गेले, ज्यांनी देशासाठी आपले आयुष्य पणाला लावले. लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्यासारखे नेते हे तमाम जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहिले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला शूर-वीरांची भूमी म्हणून प्रसिद्ध केले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्याच शिवरायांचे भक्त बनून अखंड हिंदुस्थानचा पुरस्कार करताना इंग्रजी राजवटीला हलवून सोडले, त्याच शिवबाच्या मातीत त्याच शिवबाचा भक्त बनून आज जर कोणी महाराष्ट्राला किंबहुना मराठी माणसाला मान-सन्मानाने जगायला शिकवले असेल तर ते हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनीच!


व्यंगचित्रकार एवढा मोठा नेता बनू शकतो हे कदाचित जगातील एकमेव उदाहरण असेल. इतर नेत्यांवर व्यंगात्मक कला चितारुन त्याच क्षेत्रात काम करणे हे फारच कठीण आहे. पंडीत जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, मोरारजी देसाई यांच्यासारखे नेते भरात असताना त्यांच्यावर व्यंगचित्र काढणे हे सोप्पे नव्हते, पण शिवरायांच्या भूमीत जन्माला आलेला मराठी माणूसच हे करु शकतो हे बाळासाहेबांनी दाखवून दिले. ‘मार्मिक’ या व्यगंचित्र साप्ताहिकाच्या माध्यमातून ‘शिवसेना’ नावाची मर्दांची संघटना बाळासाहेबांनी प्रबोधनकारांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन केली. शिवसेनेचे वय आज ४५ वर्षे जरी असले आणि स्थापनेपासून काम करणारे शिवसैनिक हे कायम तरुणच असतात, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.

४५ वर्षांपैकी जवळ जवळ ४० वर्षे सत्ता नसतानाही आक्रमक संघटना कशी टिकू शकते हे अनेकांना पडलेले कोडे आहे. तात्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनीही शिवसेना संपविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले असे आजही वाचनात येते, एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या प्रयत्नांनी शिवसेना संपू शकली नाही याचा अर्थ यात कुठेतरी दैवी शक्ती असलीच पाहिजे असे मानले तरी हरकत नाही. आजही काहीजण शिवसेना संपविण्याची कोल्हेकुही करत असतात पण या चिटपाखरांना ४२ पिढ्याही शक्य होणार नाही हे सगळ्यांना माहिती आहे.

बाळासाहेबांनी शिवसेनेत नुसती माणसांची भरती केली नाही तर निष्ठावान मावळ्यांची फौज स्वत:च्या जादुई नेतृत्वाने उभी केली. बाळासाहेब वयाने थकले असले तरी त्यांची जादु आम्हा तरुणांवर कायम आहे. अनेकजणांना साहेबांची भाषण ऐकता आली नाहीत परंतु जे काही वाचून कळते त्यावरुन साहेबांचे मोल आम्हा तरुणांसाठी फार मोठे आहे. ‘जिथे पिकते, तिथे विकले जात नाही’ ही म्हण मराठी माणसासाठी चपखल लागू पडते. शिवाजी महाराजांच्या जयंतीपासून ते दादोजी कोंडदेवांपर्यंत आपण इतिहास जगण्यापेक्षा त्यावर वादच करत बसलो. बाळासाहेबांसारखे आधुनिक आणि प्रगतीशिल नेतृत्व असतानाही आमच्या महाराष्ट्राने संधी दिली ती केवळ साडेचार वर्षासाठीच! त्याही साडेचार वर्ष मिळालेल्या संधीचे सोने करुन साहेबांनी अनेक विकासकामे करुन दाखविली. शिवशाही सरकारच्या कामांमध्ये प्रामुख्याने मुंबईतील ५५ उड्डाणपुल, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर वांद्रे-वरळी सागरीसेतू ही कामे आहेतच, तसेच सर्वसामान्यापर्यंत सरकार पोहचले पाहिजे यासाठी अनेक सरकारी उपक्रम कोकणासारख्या मागासलेल्या भागात आणले. आजच्या तरुणाला प्रगती आणि विकास या दोन गोष्टी महत्वाच्या वाटतात, बाळासाहेबांनी मुळात त्या शिवसेनेत यापूर्वीच राबविलेल्या आहेत. मुंबईमध्ये मागची अनेक वर्षे महानगरपालिकेत सत्तेत राहून शिवसेनेने मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर असल्याने सिद्ध करुन दाखविले आहे. महानगरपालिकेकडे असलेले मर्यादित अधिकार बघता देशातील इतर महानगरपालिकांमध्ये मुंबई कैक पट पुढे आहे.

बाळासाहेब हे तरुणांचे आदर्श नेते आहेत आणि कायमस्वरुपी राहणार आहेत. स्पष्ट बोलणारा माणूस राजकारणात स्वकर्तुत्वावर टिकू शकतो हे साहेबांनी दाखवून दिलेय पण त्यामुळे अनेकांची गोचीही झालेली आहे. बाळासाहेबांचेच जुने मित्र शरद पवार हे एकेकाळी साहेबांच्या स्पष्टवक्तेपणामुळे साहेबांपासून लांब गेले होते. अनेकजण साहेबांच्या याच स्वभावामुळे जवळ यायला तयार होत नाहीत. साहेबांनी शिवसैनिकांवर जेवढे प्रेम केले तेवढे कुणावरच केले नसेल. जगातील कुठल्याही पक्षातील कार्यकर्त्याला समाजात मान नसेल इतके मान शिवसैनिक म्हणून मिळते हा आम्हा शिवसैनिकांचा अनुभव आहे. पैसा-संपत्ती या मोहात न पडता केवळ मराठी अस्मितेचे जतन झाले पाहिजे यासाठी अनेक मोठ्या लोकांशी साहेबांनी पंगा घेतला. परंतु स्वत:च्या विचारांशी आजही कायम प्रामाणिक राहिले आहेत.

बाळासाहेबांसारखे नेतृत्व हे अनेक वर्षांनी जन्माला येते. बाळासाहेबांच्या भाषणाची नक्कल करुन, वेगळे दुकान मांडून, मराठी माणसाच्या विश्वासाचा वापर स्वत:चे पोट भरण्यासाठी केलेले काही स्वयंभू नेते साहेबांच्या कुटूंबातच जन्माला आले हे सर्वांचे दुर्भाग्य आहे. परंतु बाळासाहेबांनी दिलेला विचार आचरणात आणण्याचे काम केवळ शिवसैनिकालाच जमते. घरदार सोडून शिवसेनेसाठी झोकून देणारे शिवसैनिक साहेबांना मिळाले एवढे भाग्य लाभलेला नेता क्वचित असेल.

आज बाळासाहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अनेकजण लिखाण करत असतात, वर्तमानपत्रांमध्ये पुरवण्या निघतात. माझाही तसाच मोडक्या-तोडक्या भाषेतील हा लेख माझ्या ब्लॉगवर लिहित आहे. आमच्या साहेबांना अखंड निरोगी आयुष्य लाभो, ही आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि साहेबांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा देतो.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!

Friday, 14 January 2011

पानिपतच्या शौर्यगाथेला २५० वर्षे पूर्ण

दिल्लीचे तख्त हलवून सोडणाऱ्या मराठ्य़ांनी १४ जानेवारी १७६१ या दिवशी आपल्या प्राणाची बाजी लावून अन्न-पाण्यावाचून आपल्या पराक्रमी वृत्तीचे साक्षात दर्शन दिले.  सदाशिवभाऊ आणि विश्वासरावांनी याच दिवशी आपल्या प्राणाची बाजी लावली. पानिपतचे युद्ध हे इतिहासात अजरामर झाले. जरी हे युद्ध मराठे हरले असतील परंतु आजही तिथे गाथा गायली जाते ती मराठ्यांचीच! अब्दाल्लीची नव्हे!!

पानिपतच्या या रणसंग्रमात धारातिर्थी पडलेल्या आमच्या पराक्रमी मराठ्यांना भावपूर्ण आदरांजली!


Thursday, 13 January 2011

तुम्ही क्लिन आहात, पण तुमच्या मंत्र्यांचे काय?


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक आश्वासने देण्याचा सपाटा लावत सुटले आहेत. ‘आदर्श घोटाळ्या’च्या पार्श्वभूमीवर श्री. पृथ्वीराजांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले असल्याने छाप पाडण्यासाठी तसेच आपली क्लिन प्रतिमा कायम ठेवण्यासाठी सतत भ्रष्ट्राचाराविरोधात भूमिका घ्यावीच लागणार आहे. 

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग हे सुद्धा मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जातात. विरोधकसुद्धा त्यांना याच नावाने संबोधतात तसेच काहीसे पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत बोलले जाते. अनेक वर्षांनी महाराष्ट्राला कॉंग्रेसने दिलेला चेहरा लोकांच्या पसंतीस उतरला. सरळ आहे एवढ्या मोठ्या घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळाले असल्याने त्यांच्या मंत्रीमंडळात भ्रष्ट्राचारी मंत्रींवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

पृथ्वीराजांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर सर्वात पहिली घोषणा केली ती स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच मंत्री करणार. या घोषणेने कॉंग्रेसमधील अनेकांचे धाबे दणाणले. नुकतेच मुख्यमंत्रीपदासाठी धावपळ करणारे नेते आता मंत्रीपद मिळण्यासाठी दिल्लीसाठी रवाना झाले. भ्रष्ट्राचारी नेते आता अडगळीत जाणार असे लोकांना वाटू लागले पण लोक एक विसरले की पृथ्वीराज जरी चांगले नेते असले तरी ते कॉंग्रेसचे नेते आहेत. मनमोहनसिंगांसारखेच पृथ्वीराजांच्या हातात फक्त मुख्यमंत्रीपद आहे, त्यांना कामे ही सोनिया गांधींच्या म्हणण्यानुसारच करावी लागणार आहेत. आणि पृथ्वीराजांच्या पहिल्या घोषणेचेही तीन-तेरा वाजले. नारायण राणे पासून अनेक् भ्रष्ट्राचाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले.

कालच पृथ्वीराजांनी म्हटलेय की, भ्रष्ट्र राजकारणी, बिल्डर आणि प्रशासकीय मंडळींनी मुंबई विकायला काढलीय. मिडीयामध्येही याला चांगली प्रसिद्धी मिळाली. मुख्यमंत्री हे बोलत असल्याने सध्याच्या कॉंग्रेसचे सरकार भ्रष्ट्राचारी आहे हे सिद्ध होतेय. पण नुसते बोलून काय होणार आहे. मुख्यमंत्री या सरकारचे प्रमुख आहेत जी कोणी मंडळी मुंबईचे लचके तोडत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना घटनेने दिलेले आहेत. आजपर्यंत मनमोहन सिंगांनी केलेली अशी वक्तव्ये आपण पेपर आणि मिडीयामधून ऐकली आहेत पण त्याने केंद्रातील भ्रष्ट्राचार कमी झालेला नाही. आपले दुर्दैव हेच की आज देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रमुखपदी अतिशय चांगल्या प्रतिमेचे लोक बसले आहेत पण ते भ्रष्ट्राचार कमी करु शकतील याची जनतेला बिल्कुल खात्री नाहिये.
पृथ्वीराज बोलले पण पुढे काय? आजच्या केंद्रसरकारमध्ये अनेक घोटाळेबाज नेते आहेत तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सुद्धा काहीशी तशीच परिस्थिती आहे. पण यावर आवर घालायला दोन्ही प्रमुखांची तयारी नाही कारण ते आपल्या कर्तुत्वाने प्रमुखपदी आलेले नाहीत त्यांना सोनिया गांधींनी प्रमुख केलेय.

Tuesday, 4 January 2011

’बहुमता’चा गैरवापर



मागच्या आठवड्यात पुण्यात दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याबाबतीत जे घडले ते केवळ दुर्दैव होते. राजकारणी आपले पाप लपविण्यासाठी कुठल्या थराला जातील याचेच हे उदाहरण म्हणता येईल. दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरु होते हे आपण सर्वजण अनेकवर्ष इतिहासात वाचत आलोय आणि आज अचानक कळतेय दादोजी शिवरायांचे गुरु नव्हते म्हणून त्यांचा लालमहालातील पुतळा कापून काढण्यात आलाय.

खरचं दादोजी शिवरायांचे  गुरु नव्हते म्हणून पुतळा काढला गेला? नक्कीच नाही! यामागचे गुपित हेच आहे की, देशात वाढणारी महागाई, लवासा प्रकरण, आदर्श घोटाळा, २जी स्पेक्ट्रम घोटाळा यामुळे महाराष्ट्रात आणि देशात सत्तेत असलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीची प्रतिमा जनतेमध्ये अतिशय मलिन झालेली आहे. खुद्द कृषीमंत्री महाराष्ट्रातील असल्याने इथल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या पाहता, शरद पवार जनतेला आता उत्तर देऊ शकत नव्हते. केवळ सरकारची झालेली पंचायत पाहता जनतेचे लक्ष दुसरीकडे कुठेतरी वळले पाहिजे याचसाठी हे प्रकरण जाणूनबुजून करण्यात आले.

देशात शिवसेना-भाजपला कॉंग्रेसवाले हिंदुत्ववादी म्हणून जातियवादी शक्ती म्हणतात पण धर्मावर आधारित राजकारण करणारे पक्ष जातियवादी होऊ शकत नाहीत हे आपण सर्व जाणतोच! आज महाराष्ट्रात जे चाललेय त्याला जातियवाद म्हणता येईल. केवळ ब्राम्हणांनी इतिहास लिहिला म्हणून तो पुसून टाकून आपल्या जातीतील इतिहासकारांचाच इतिहास खरा मानला गेला पाहिजे हे म्हणजे जरा अतिच झाले की राव!  इथे इतिहास तज्ञच केवळ यावर जास्त चांगले बोलू शकतात किंवा लिहू शकतात त्यामुळे कुठलेही वाद-विवाद जे असतील ते त्यांच्यातच राहिले पाहिजे. पण पुण्यात जे घडले ते केवळ अचंबित करणारे होते. पुणे महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या नगरसेवकांनी पुणे महानगरपालिकेत बहुमताच्या जोरावर हे सगळे घडवून आणले. आता यावर काय कपाळ आपटणार?

जर सगळीकडे बहुमताच्या जोरावर असे काही घडायला लागले तर त्यात लोकशाहीची उरलेसुरलेली वस्त्रेही गळून पडतील. कॉंग्रेस-राष्ट्रवादीला काही कायमस्वरुपी सत्ता उपभोगायला मिळाली असल्याच्या थाटात ते वागत आहेत. पण भस्मासुर जसा शंकरावर पालटला तसाच सत्तेचा भस्मासुर यांच्यावर पालटू शकतो. आज सत्ता आहे म्हणून मनात येईल तसे वागायचे आणि जनतेला वाऱ्यावर सोडून आपल्याला हवा तसा पैसा कमवायचा हे कुठले धोरण आहे? बहुमताच्या जोरावर सगळ्या गोष्टी होणार असतील पुणे महानगरपालिकेने घेतलेल्या निर्णयावर राज्यातील आघाडी सरकार कानावर हात ठेवणार असेल तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने बहुमताच्या जोरावर लोंढ्यांच्या बाबतीत असलेली भूमिका बहुमताने पास केली तर त्याला कॉंग्रेस- राष्ट्रवादीवाले विरोध करणार नाहीत का? आघाडी सरकार कानावर हात ठेवून तो त्यांच्या बहुमताच्या जोरावर घेतलेला निर्णय मानून गप्प बसतील का? तर नक्कीच नाही!

म्हणून यासरकारने आपले घोटाळे बाजूला ठेवून अशाप्रकारचे सुडबुद्धी राजकारण करु नये. काही वर्षापूर्वी बिहार-उत्तरप्रदेश मध्ये सत्तेच्या बळावर विरोधकांवर सुडबुद्धीचे राजकारण चालायचे. आज बिहारची प्रतिमा देशात अतिशय सुधारलेली आहे. मग म्हणून आपला पुरोगामी महाराष्ट्र आता बिहारच्या दिशेने वाटचाल करणार का?