Showing posts with label India. Show all posts
Showing posts with label India. Show all posts

Sunday, 15 May 2011

निवडणूका संपल्या की हमखास भाववाढ ठरलेली असते..


महागाईने सध्या सर्वोच्च उसळी घेतलेली आहे. देशात कुठल्याही प्रांतात निवडणूका झाल्या की हमखास भाववाढ होत असते. परवाच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पॉंडेचरी आदी पाच राज्याचे निकाल हाती आले. निकाल लागून २४ तास उलटतात तोच पेट्रोल रु. ५ प्रती लीटर भाववाढीची बातमी देशाला ऐकायला मिळाली आणि सर्वत्र सरकारविरोधात चीड व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल भाववाढीचा फटका फक्त गाडी असलेल्या जनतेलाच बसत नसतो. इंधन भाववाढीचा थेट संबंध हा प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीवर होत असल्याने सर्वसामान्यांपासून सर्वांनाच याचा फटका बसत असतो. सरकारचे यावर ठरलेले उत्तर असते, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती वाढल्याने भाववाढीशिवाय पर्याय नाही, परंतु हेच सरकार जेव्हा निवडणूका सुरु असतात तेव्हा कुठल्याही प्रकारची भाववाढ न करता देश कसा चालवतात, हे त्यांनाच माहीत.

काल रात्रीपासून भाववाढ झाल्याने आता उद्या सोमवारपासून सर्वसामान्य जनतेला याची खरी झळ पोचायला सुरुवात होणार आहे. देशात कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी ही भाववाढ रोखू शकत नाही हे मान्य. पण घोटाळे आणि मंत्र्यांची चैन तसेच अवाजवी दिले गेलेले भत्ते यामुळेही भाववाढीवर काही प्रमाणात अंकुश घालता येऊ शकते. देशातील सर्वच भ्रष्ट्राचारी पैसा खाऊन काही दिवस जेलमध्ये राहून मग आरामाचे जीवन आपापल्या पक्षात राहून जगतात, पण ज्या जनतेचा यात कसलाही दोष नसतो तीला मात्र आपले आयुष्य न वाढलेल्या उत्पन्नातच कंठत काढावे लागते.


मागच्या काही काळातील भाववाढीचे आकडे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.



Sunday, 20 February 2011

बांग्लादेशला आपण चिरडायला हवे होते

काल आपण बांग्लादेशवर एक मोठा विजय मिळवून विश्वचषकाची सुरूवात अगदी दणक्यात केलेली आहे. जणू १७ फेब्रुवारीचा उद्धाटन सोहळा अजून संपला नव्हता. विरूने मागच्या विश्वचषकाचा वचपा काढायचा होता तो अशा प्रकारे असेल याची कुणीही कल्पना केलेली नसेल. विराट कोहलीबद्दल काही न बोललेले बरे आहे, हा गडी एकदिवसीय सामने खेळायला लागल्यापासून विकेटवर सेट झालेला आहे. विराटने मागच्या २०१० वर्षात ९९५ धावा केल्यात आणि या वर्षाची सुरूवात त्याने दक्षिण आफ्रिकेतून केलेली आहे.

हा विश्वचषक हिंदुस्थानच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. सचिनचा शेवटचा विश्वचषक असल्याने तो सचिनसाठी जिंकला जावा अशी तमाम हिंदुस्थानवासियांची भावना आहे, आणि विरूच्या खेळीतून हे स्पष्ट झाले. यापूर्वी विश्वचषक आयोजक देश स्पर्धा जिंकत नसत, पण १९९६ला श्रीलंकेने हे खोडून काढलेय. मागचा उपखंडातील विश्वचषक श्रीलंका जिंकू शकते तर आता आपणही जिंकलोच पाहिजे, असे म्हणणे चुकीचे नाही.

काल सकाळी वर्तमानपत्रातील विश्वचषकाचे बांग्लादेशाविरूध्दच्या २००७ च्या सामन्याबाबत लिहिलेले होते. बांग्लादेशाविरूध्दची हि चिड गेली ४ वर्षे प्रत्येक हिंदुस्थानींच्या मनात जखम करून बसली होती, या विश्वचषकात ही संधी उद्घाटनाच्या सामन्यात चालून आली. अपेक्षेप्रमाणे फलंदाजीमध्ये आपण बांग्लादेशाला अक्षरश: बुकलून काढलेले आहे. एखाद्या सामन्यात ३७० धावा काढणे हे कधीच सोप्पे नसते. पण तरीही विजयाची किमान अपेक्षा १०० धावांची होती ती काही पूर्ण करू शकलो नाही. विजय हा विजय असतो, मग तो १ धावेने का असे ना विजयाचे महत्व कधीच कमी जास्त नसते.  असो आपली गोलंदाजी हा कच्चा दुवा आहेच, आणि खिशात ३७० धावा असताना अशा चुका सुधारण्याची संधी नक्कीच आहे.

पहिला सामना जिंकून आपण विश्वचषकाची सुरूवात खुप चांगली केलेली आहे. आता पुढेही चांगला खेळ करून विश्वचषक जिंकावा यासाठी आपल्या संघाला मनापासून शुभेच्छा!

Wednesday, 9 February 2011

मिडीयाला आत्मपरीक्षणाची गरज आहे

काही वर्षापासून मिडीया हा सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. अनेक घटनांची माहिती घरबसल्या मिळत असल्याने देशात वृत्तचित्र वाहिन्यांना लोकांनी डोक्यावर उचलून धरले. एका इंग्रजी चित्रपटात एक डायलॉग आहे, जेव्हा शक्ती मिळते, तेव्हा जबाबदारीही येते. आज आपल्याकडची मिडीया याच्या परस्परविरोधी वर्तन करताना दिसतेय. एखाद्या संघटनेला, व्यक्तीला किंवा समुहाला टारगेट करून बातम्या बनविणे हा यांचा धंदा बनलेला आहे. अर्थात चांगले पत्रकार नाहीतच असे मुळीच म्हणायचे नाही.

मिडीया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला जातो पण ज्याप्रमाणे राजकारणी मोकाट सुटू लागले अगदी तशीच मिडीयासुध्दा आज मोकाट सुटलेली आहे. कधी, कुठे, काय दाखवायचे याचे भान नसलेले काही पत्रकार जेव्हा नैतिकतेची भाषा करतात तेव्हा हसावे की रडावे तेच कळत नाही.
हल्लीच अजीत पवार यांनी मिडीयासाठी दंडुक्याची भाषा केलीय. जनतेलाही तसेच वाटते की मिडीयावर कुणाचे तरी नियंत्रण असले पाहीजे. कुठल्याही सी ग्रेड चित्रपटाप्रमाणे काही दृष्ये दाखवताना हे कधीच काही विचर करत नाही का? की टीआरपी साठी हे आता काहीही करायला तयार आहेत? केवळ पैसा आणि टीआरपी याचसाठी असे सगळे चालणार असेल तर अजीत पवार चुकीचे बोलले असे मुळीच वाटत नाहीत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वत: एक पत्रकार असताना अनेकदा पत्रकारांवर तुटून पडतात, म्हणून जवळजवळ सर्वच चॅनेलनी शिवसेनेवर अघोषीत बहिष्कार टाकलेला आहे. शिवसेनेच्या चांगल्या गोष्टी नकारात्मक पध्दतीने दाखवून पत्रकार आपल्याच प्रोफेशनशी नकळत बेइमानी करत आहेत. दोनच दिवसांपूर्वी शहिद उन्नीकृष्णनच्या काकांनी शहिदांना न्याय मिळत नाही म्हणून जाळून स्वत: ला जाळून घेतले आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. ही खरं तर खुप मोठी घटना आहे. पण आमचे पत्रकारांना याबद्दल दखल घ्यावेसे वाटले नाही. एखादी मोठी घटना घडते आणि मिडीयामध्ये येत नाही तेव्हा लोकांनाही अशा घटना समजत नाहीत. याला जबाबदार कोण?

मिडीयाला बोलले किंवा हल्ला झाला की उगाच थिल्लर चाळे करण्यापेक्षा अशा घटना का घडतात हे एकदा मिडीयावाल्यांनीच तपासावे. इतरांना सल्ले देणे सोपे असते पण स्वत: आचरणात आणणे कठीण असते.

Wednesday, 2 February 2011

जिवंत नागरीकांची प्रतिक्रिया अशीच असू शकते...

ट्युनेशिया, येमेन नंतर आता इजिप्तमधील जनतेने सरकारविरोधात उठाव केला आहे. या देशांमधील नागरीकांच्या एकीला खरे तर सलाम केले पाहिजे. गेली अनेक वर्षे सत्तेत असलेल्या हुस्नी मुबारक यांच्या विरोधातील बंड जवळजवळ यशस्वी झाल्यासारखेच आहे. कालच हुस्नी मुबारक यांनी यापुढील निवडणूकांमध्ये सहभाग न घेण्याचे जाहिर केले आहे. जनतेसमोर हे हुकूमशहा झुकत असताना आमच्या जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे बडविणा-या देशातील जनतेच्या मनातही असा विचार येत असेल का?

आपल्या देशात लोकशाही आहे, इथले सरकार हे लोकांनी निवडून दिलेय हे सत्य आहे. परंतु लोकांना त्यांचे अधिकार जाऊ द्या, साधे दोन वेळचे पोट भरण्याची सोय तरी आहे का? हिंदुस्थान हा देश गरीब नक्कीच नाही. २०२० मध्ये आपला देश जागतिक महासत्ता असणार आहे, आपली जीडीपी ग्रोथ सतत वाढत असल्याचे आपले पंतप्रधान सांगत असतात. जर पुढच्या ९ वर्षात आपण आर्थिक महासत्ता बनणार असू तर त्यात तळागाळातल्या गरीब जनता असेल की नाही?

जीडीपी ग्रोथ किंवा सरकार जे आता भरारीचे दाखले देतेय यातले देशातील सर्वसामान्य जनतेला काहिच कळत नाही. १२-१२ तास काम करुन महिना रू.२०००-५००० कमावणारी जनता आजच्या महागाईसमोर पार कोसळून गेलीय, कधी कांदा, कधी टॉमेटोचे भाव वाढतात. पेट्रोलचे भाव तर आमावस्या-पोर्णिमेला वाढत आहेत. तरी सरकारचे मंत्री महागाई असल्याचे मान्य करीत नाहीत.

आमच्या देशातील जनतेच्या हाती मताचे हत्यार असल्याचे लोकशाहीचे फाजिल लाड करणारे सांगत असतात, पण पाच वर्षे हालाखीचे काढून हत्यार उपसण्याची वेळ येते तेव्हाच आमचे चलाख मंत्री भ्रष्ट्राचाराचा पैसा जनतेमध्ये वाटून पुन्हा सत्ता बळकावतात. ज्यांनी प्रामाणिकपणे चिडून सरकारविरोधी मतदान केलेले असते ते केवळ कपाळाला हात लावल्यावाचून काहीच करु शकत नाहीत.

ट्युनेशिया, येमेन आणि इजिप्तसारखेच इथल्या जनतेने खरे तर आतापर्यंत पेटून उठायला हवे होते. पण तसे काही घडलेले नाही किंवा घडणार नाही अशी पक्की खात्री सरकारला आहे. गांधीजींच्या अहिंसेला कॉंग्रेसने कधीच मुठमाती दिलीय, पण जनतेने हमखास त्याच मार्गाने चालावे असे कॉंग्रेसवाल्यांना वाटते. हा देश अनेक क्रांतीकारकांच्या बलिदानाने स्वतंत्र झालाय हे जनतेला माहीत असावे. हे कॉंग्रेसचे सरकार गेल्याशिवाय सर्वसामान्यांना सुखाचे दिवस दिसणार नाहीत, हे सत्य आहे. नसेल पटत उदाहरण म्हणून देशातील कॉंग्रेसेतर राज्यांची प्रगती पहा!

Monday, 24 January 2011

हिंदुस्थानात तिरंगा फडकविणे म्हणजे गुन्हा?

भाजपच्या युवक मोर्च्याने २६ जानेवारी हिंदुस्थानच्या प्रजासत्ताक दिनी काश्मिरमधील लाल चौकामध्ये तिरंगा फडकविण्याचे ठरविले आणि तशी तिरंगा यात्रा देशाच्या वेगवेगळ्या प्रांतातून सुरु झाल्या. परवा २६ जानेवारी आहे, तिरंगा यात्रा आज पंजाबमधून काश्मिरच्या दिशेने निघत आहे. परंतु काश्मिरमधील सत्तेत असलेल्या नॅशनल कॉन्फरन्सच्या मुख्यमंत्र्यांना भिती वाटतेय की यामुळे काश्मिरचे सामाजिक स्वास्थ बिघडेल, काश्मिरमध्ये अशांतता पसरेल..

भाजपसुद्धा काश्मिरमध्ये तिरंगा फडकवून लोकांपर्यंत पोहचण्याचे राजकारण करतेय हे सत्य आहे. परंतु चुकीचे असे नक्कीच काही करत नाही. ज्या राज्यघटनेचा वारंवार उल्लेख केला जातो त्याच घटनेच्या प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकविणे हे कॉंग्रेसच्या दृष्टीने पाप म्हटले जातेय, हे राज्यघटनेचेच दुर्दैव म्हणायला हवे. भाजपवाले तिरंगा आपल्याच देशाच्या जमिनीवर फडकवत असल्याने त्यात विशेष असे काहीच म्हणता येणार नव्हते, पण तो तिरंगा भाजपवाले फडवत आहेत म्हणून कॉंग्रेसच्या पोटात दुखायला लागले आणि त्यांनी यामध्ये राजकारण आणले.

कॉंग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सवाल्यांचे म्हणणे आहे की, काश्मिरमधील फुटीरतावाद्यांमुळे अगोदरच तिथे अशांतता असताना तिरंगा फडकविल्याने आणखी परिस्थिती खराब होईल म्हणजेच हे दोन्ही पक्ष स्वत:च सांगत आहेत की यांना सरकार चालविणे कठीण जातेय. फुटीरतावादी शक्ती या देशात पसरविली कोणी? तर कॉंग्रेसवाल्यांनीच! तब्बल ६० वर्षाच्या सत्तेत कॉंग्रेसने या देशासाठी काहीच केले नाही हे सत्य आहे, परंतु जर काही केले असेल तर देश-विघातक कारवाया करणाऱ्यांचे बळ वाढविणे. याबाबतीत पुढे कॉंग्रेसवाल्यांचे म्हणणे आहे की, काश्मिरमधील सामाजिक स्वास्थ्य बिघडेल म्हणजेच कॉंग्रेसवाले सर्वसामान्यांची किती काळजी घेत आहेत बघा!

काश्मिरमध्ये तिरंगा फडकविल्याने हिंदुस्थान देशातील एका प्रांताचे सामाजिक स्वास्थ्य कसे बिघडू शकते? असे म्हणणाऱ्यांना उघडे करुन चाबकाचे फटके दिले पाहिजेत. जर तिरंगा फडकविल्याने सामाजिक स्वास्थ्य बिघडू शकते तर अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याने देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडले आहे त्याची जबाबदारी कॉंग्रेस घ्यायला तयार आहे? अफजल गुरुने देशाच्या संसदेवर हल्ला करुन देशाचे नाक कापून देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवले त्याला सुप्रिम कोर्टाने ऑक्टोबर २००६ ला फाशीची सजा दिलीय पण कॉंग्रेसवाल्यांनी त्याला सोनियाचा जावई बनवून ठेवला घेतला आहे. २६/११ ला मुंबईमध्ये ७२ तास धुमाकूळ घालणाऱ्या कसाबच्या टोळीने आणखी एकदा देशाची मान शरमेने झुकवली, पंतप्रधान मुंबईकरांचे कौतुक करतात पण कसाब कसा सुरक्षित राहिल याची काळजी कॉंग्रेसवाले आणि सोबत राष्ट्रवादीचे आबा पाटील आणि भाजपाचे एकनाथ खडसे करत आहेत. मुंबईमधील वाढत्या लोंढ्यांनी मुंबईचे स्वास्थ्य रोजच बिघडत आहे. मुंबईची अवस्था परप्रांतियांनी खराब केली आहे. करदात्या मुंबईकरांना सुविधा पुरविताना महानगरपालिकेच्या नाकी नऊ येत असताना इथेही कॉंग्रेसवाले काही ठोस निर्णय घेत नाहीत, आणि तिरंगा फडकविल्याने सामाजिक स्वास्थ बिघडेल म्हणून इतकी काळजी?

या सर्व गोष्टींना कोण जबाबदार असेल तर जनता. झोपी गेलेली जनता कधी जागी होणार आहे की नाही ते माहित नाही. देशप्रेमींना या देशात देशद्रोही ठरविण्याचे काम कॉंग्रेस मागची अनेक वर्षे करीत आहे. सावरकर्, भगतसिंग, राजगुरु, सुखदेव, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्यांचा कधीही सन्मान केला गेला नाही. तरीही ही झोपी गेलेली जनता आजही कॉंग्रेसच्या चिपळ्या वाजवतेय हेही या देशाचेच दुर्दैव!

Friday, 7 January 2011

आकडे सांभाळायचे की खेळ खेळायचा?

काल हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शेवटचा कसोटी सामना ड्रॉ झाला. (की ड्रॉ केला म्हणू या) काल शेवटच्या दिवशी हिंदुस्थानला ३४० रन्स करायच्या होत्या त्या तब्बल ५४० बॉल्स मध्ये पण आपल्या सेह‘वाघ’ची सुरुवात बघून कळले की आपण हा सामना जिंकायचा विचारच केलेला नाही.

काल खरच इतके स्लो खेळायची आवश्यकता होती का? आपण वर्ल्ड रॅंकिंगमध्ये पहिल्या नंबरवर आहोत. मनात विचार आला याजागी ऑस्ट्रेलिया किंवा खुद्द दक्षिण आफ्रिका खेळत असती तरी त्यांनी १००% सामना जिंकण्यासाठी खेळला असता. आपल्याकडे विरेंद्र सेहवागसारखा स्फोटक बॅट्समन असताना ड्रॉ करण्याचा निर्णय अगोदर घेणे म्हणजे कसेही करुन एक नंबर टिकवून ठेवण्यासाठी केलेली ऍडजस्टमेंट म्हणू या.

कालच्या सामन्यात विरुने ४० खेळला आणि सचिन तब्बल ९१ बॉल्स खेळला तरीही आपला स्कोरबोर्ड पाहिजे तसा दिसला नाही. कुर्मगतीने खेळून खरे तर आपल्या संघाने आपल्या क्रिकेटप्रेमींची निराशा केली. निदान सेहवागला त्याचा नैसर्गिक खेळ करु दिला असता आणि त्याने स्फोटक खेळून कमी वेळात जास्त रन्स केले असते तरी आपले टारगेट कमी झाले असते आणि पुढे सचिन फॉर्ममध्ये असताना किमान ७०-७२ च्या रेटने रन्स करु शकत असताना आपण जिंकायचा सामना ड्रॉ केला असेच म्हणावे लागेल.

वर्ल्ड कप तोंडावर असताना जर कोणी म्हणत असेल की मालिका हरली असती तर आत्मविश्वास गेला असता पण यापुढील वन-डे मालिका हरली तर हे वर्ल्ड कप साठी कुठूण आत्मविश्वास आणणार आहेत? महेंद्रसिंग धोनीने आपल्या कर्णधारपदी असताना अजून कुठलीही मालिका हरलेली नाही, म्हणून तो अजेय आहे असे म्हणता येणार नाही. यशाबरोबर अपयश आल्याने त्याची मज्जा सुद्धा चाखताना बरे वाटते. पण कालच्या या निर्णयामुळे खरेच आपण आकडे सांभाळत बसलो असे वाटते.