रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहून सर्वसामान्यांना मनाची ओळख करुन दिलीय. बहिणाबाई चौधरींनी ‘मन वढायं वढायं, उभ्या पिकातील ढोरं’ म्हणुन मन किती चंचल असते याबद्दल आपल्या कवितेतून सांगितलेय. खरचं आपण आपल्या मनावर ताबा मिळवून जे हवेय ते साध्य करु शकतो का? आपल्याला आपल्यातील संपूर्ण कार्यक्षमतेबद्दल जाणिव असते का? आपण जसे जगतो तेच आपले नशिब असते का? काहीजणांना प्रत्येक गोष्टीत यश मिळते तेव्हा आपण त्याचं नशिब फार चांगले आहे, असे म्हणतो. मला स्वत:ला अशा लोकांचे फार अप्रुप वाटते.
कुठून आणतात ही लोक एवढी ताकद? कसे जमते यांना? आपण अनेक पुस्तक वाचतो पण त्याने आपल्यात फार काही बदल होत नाहीत. आजकाल असे काही लोक आहेत जी आपल्यातील सुप्त गुणांना जाणिवपूर्वक चालना देऊन आपली कार्यक्षमता ओळखून अगदी जाणिवपूर्वक यश मिळवतात. काहीजण आपल्यातील गुणांना हेरतात तर काहीजण व्यक्तीमत्व विकासासारख्या कार्यक्रमात जाऊन स्वत:च्या वैयक्तिक, पारिवारीक किंवा व्यावसायिक जीवनात यश मिळवतात.
कालच लक्षवेधच्या सेमीनारला गेलो होतो. मी अशाप्रकारच्या कुठल्याच सेमीनार कधी गेलो नसल्याने तिथे काय सांगतात याबद्दल माहिती नव्हती. परंतु सेल्फ हेल्प सारखी पुस्तकं वाचल्याने साधारणपणे काय सांगितले जात असेल याबद्दलची थोडीफार कल्पना आली होती. अतुल राजोळींचे ते साडेतीन तासांचे लोकांना खिळवून ठेवण्याच्या कौशल्याने नक्कीच प्रभाव पडला. तसेच जे काही तिथे त्यांनी उदाहरणे दिली त्याबद्दल आपण कधीच विचार करत नाही हे प्रामाणिकपणे मान्य करायला हवे.
दिवसात आपण ६०,००० वेगवेगळे विचार करतो, त्यातील कित्येक गोष्टी आपण काही क्षणात विसरुन जातो. दिवसाभरात आपल्या मनात आलेल्या विचारांची नोंद ठेवायला गेलो तर ठार वेड व्हायला लागेल. पण काही चांगले विचार नक्कीच लक्षात ठेवू शकतो. आपण दिवसात कितीतरी गोष्टी केल्या पाहिजेत असे ठरवतो पण प्रत्यक्षात त्या आपल्या हातून होत नाहीत याबद्दल नक्कीच आपल्याला काही वाटत नाही. पण ज्या गोष्टी आपण ठरवतो त्यातल्या काही का होत ना त्यावर आपण कृती केली तर? आपल्याला नक्कीच खुप मोठे समाधान मिळू शकते. इतकी साधी-सोपी गोष्ट पण आपण करत नाही, यामध्ये कुठेतरी काही गडबड असली पाहिजे जी आपण ओळखली पाहिजे.
खरचं आपण आपल्या आयुष्याबद्दल जास्त सिरियस नसतोच. अनेक गोष्टी आपण हलक्या पध्दतीने घेतो ज्या कुठे ना कुठे आपल्या जीवनावर परिणाम करत असतात. यशाच्या मागे नुसते धावण्यात अर्थ नाही, पण ते मिळवण्यासाठी आपल्याला जे मानसिक आणि शारिरीक समतोल राखता आले पाहिजे त्यासाठी आपल्या आत जे काही सुरु असते ते ओळखायला शिकले पाहिजे.
No comments:
Post a Comment