ICC च्या मुंगेरीलाल के हसीन स्वप्नांशी सध्या विश्वचषकातल्या ‘ब’ गटातील लिंबूटिंबू खेळताना दिसत आहेत. पिसाळलेल्या वाघासाठी पिंज-यात गरीब बिचा-या बकरीला सोडावे अगदी तसेच दोन्ही गटात तीन-तीन संघांना ठेवले होते. ‘अ’ गटात आतापर्यंत बक-यांचे लचके तोडले गेले आहेत, किंबहुना विश्वचषक रटाळ होतोय तो ‘अ’ गटातील एकतर्फी सामन्यांमुळेच! पण ‘ब’ गटात त्यामानाने तुल्यबळ सामने बघायला मिळत आहेत.
कालच्या इंग्लंड-आर्यलंड सामन्यात विक्रमी टारगेट गाठून आयरीश खेळाडूंनी या वर्षीही मोठ्या संघांना बाहेर काढण्याचे काम करणार आहोत असा सुतोवाच दिलाय. ३२९ धावांचं लक्ष्य आजपर्यंत कुठल्याही संघाला विश्वचषकात गाठता आलेले नाही. परवा इंग्लंड जिंकली असती तर तेव्हाच हा विक्रम होऊ शकला असता, पण नियतीच्या मनात फार वेगळे होते, जो विक्रम जवळपास त्यांच्या नावावर होणार होता तोच त्यांच्या विरोधात झालाय.
आयर्लंडने विश्वचषक इतिहासातील सर्वात मोठे लक्ष्य पार तर केलेच सोबत केवीन ओब्रायनने विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात जलद शतक साजरे करून दुहेरी विक्रम केला. जवळ जवळ ३० षटकांपर्यंत इंग्लंडच्या हातात असलेला सामना आयर्लंडसारख्या कसोटी दर्जाही नसलेल्या संघाने आरामात खिशात टाकला हे विश्वचषकात रोमांचक लढती होत असल्याचे दाखवतेय. हिंदुस्थानव्यतिरिक्त इतर सामन्यांकडे पाठ फिरवणा-या प्रेक्षकांना सर्वच लढती बघण्यासाठी नक्कीच आकर्षित करतील अशी अपेक्षा करायला हरकत नसावी.
आता ‘ब’ गटातील लढती जिंकू किंवा मरू अशाच होणार. गटातील ७ पैकी ६ संघांनी प्रत्येकी एक विजय मिळविला आहे, तर हिंदुस्थान आणि इंग्लंड लढत बरोबरीत सुटल्याने या दोन संघांकडे ३-३ गुण आहेत. या गटातील पुढील फेरीसाठीचे ४ संघ कोण असतील हे सांगणे दिवसेंदिवस जास्त कठीण होऊन बसत आहे. हिंदुस्थान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन संघाचे पुढे जाणे ग्रहीत धरले जात होते पण कालच्यासारख्या लढती बघून असे ठामपणे सांगणे कठीण आहे. चौथा संघ हा नेट रन रेटनेच पुढे येईल असे दिसतेय.
गेल्या वेळेस हिंदुस्थान आणि पाकिस्तान पहिल्या फेरीत बाद झाल्याने उडालेला फज्जा पाहता यावेळेस मोठे संघ पुढे जावेत यासाठी कसोटी दर्जा नसलेल्या संघांच्या कत्तली करायच्या ICC च्या मनसुब्यांवर पाणी नाही फिरले म्हणजे झाले.
2 comments:
" कालच्या इंग्लंड-आर्यलंड सामन्यात विक्रमी टारगेट गाठून आयरीश खेळाडूंनी या वर्षीही मोठ्या संघांना बाहेर काढण्याचे काम करणार आहोत असा सुतोवाच दिलाय. ३२९ धावांचं लक्ष्य आजपर्यंत कुठल्याही संघाला विश्वचषकात गाठता आलेले नाही. परवा इंग्लंड जिंकली असती तर तेव्हाच हा विक्रम होऊ शकला असता, पण नियतीच्या मनात फार वेगळे होते, जो विक्रम जवळपास त्यांच्या नावावर होणार होता तोच त्यांच्या विरोधात झालाय."
हा उतारा मस्तच जमला आहे
@प्रशांत... धन्यवाद!
Post a Comment