उद्या महाराष्ट्रातील 10 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणूका होत
आहेत. राज्य निवडणूक आयोगाने सरकारी आणि खाजगी कार्यालय बंद ठेवण्याचे आवाहन
केलेले आहे त्यानुसार बहुतांश कार्यालये बंद राहणार आहेत पण ज्या मतदानासाठी ही
कार्यालये बंद असणार आहेत त्यातले मतदार नक्की मतदानाला उतरतील का? हा मोठा प्रश्नच
आहे.
निवडणूक म्हटले की प्रचारात शिमगाच असतो. एकमेकांची उणीधुनी काढण्याचे
जोरदार कार्यक्रम मैदानात सुरु असतो तसाच तो फेसबुकसारख्या सोशल नेटवर्कींग साईटवर
सुध्दा दिसत आहे. ओबामामुळे हल्ली आपल्या देशात इंटरनेट हे प्रचाराचे प्रमुख
माध्यम बनायला लागले आहे. मागची अनेक वर्षे कुठेच न दिसणारे नेते आणि उमेदवार
फेसबुकवर मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी इंटरनेटचा वापर करायला लागलेत. काही हवशे-गवशे-नवशे
तर चक्क फेसबुकवर जाहिरीती देऊन आपला प्रचार करत होते. पण निवडणूका संपल्यावर हेच
लोक त्याच जोशमध्ये मतदारांशी थेट संवाद साधायला उपलब्ध असतील का?
आपल्याकडील सुशिक्षीत मतदारांची ओरड असते विकासकामांवर निवडणूका
लढविल्या गेल्या पाहिजेत, पण तसे एक उध्दवसाहेब ठाकरे सोडले तर कोणीही करताना दिसत
नव्हते. शिवसेना मागची 15 वर्षे मुंबई महानगरपालिकेत सत्तेत आहे, खरं तर त्यांच्या
विरोधकांनी विकासकामांवर निवडणूका लढविल्या पाहिजे होत्या पण तसे न होता
शिवसेनेच्या ‘करुन दाखवलं’ उपक्रमालाच विरोध करण्यात वेळ घालवून विरोधकांनी
आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला. शिवसेनेकडे महानगरपालिकेची सत्ता का येते
यामागे नक्कीच विचार करण्यासारखी काही कारणं या ‘करुन दाखवलं’ मध्ये नक्कीच आहेत.
मागच्या महिन्यात उध्दवसाहेब ठाकरेंच्या संकल्पनेतील ‘संयुक्त महाराष्ट्र
दालन’ बघायला
गेलो होतो. वाटलं होत शिवसेनेनं बनविले आहे म्हणजे त्या कामाचे श्रेय घेण्यासाठी
कुठेतरी शिवसेनेचा उल्लेख नक्कीच असले पाहिजे. पण एक उद्घाटनाची पाटी सोडली तर आत
फक्त आणि फक्त संयुक्त महाराष्ट्राच्या रक्तरंजित इतिहासावरील शिल्पे, चित्र आणि
माहिती वाचायला मिळाली. शिवसैनिक म्हणून एकवेळ विचार आला की प्रबोधनकर आणि
बाळासाहेबांचे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात योगदान असतानाही शिवसेनेने त्याचा
उहापोह या दालनात कुठेही केलेला नाही.
अशाच प्रकारची अनेक कामे उध्दवसाहेबांनी ‘करुन दाखवलं’ मध्ये फोटोसहित
दिली आहेत. पण आपल्याकडील पक्के राजकारणी विरोधकांना मात्र यावर निट भाष्य करणं
जमलेच नाही. मुंबईचा विकास होतोय ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. विरोधाला विरोध
करण्यात विरोधी पक्षांचा नक्कीच फायदा आहे पण सर्वसामान्य माणसाला त्याचा काहीही
फायदा नाही.
शिवसेना महानगरपालिकेत सत्तेत असताना मागची अनेक वर्षे कुठल्याही
प्रकारची करवाढ करण्यात आलेली नाही. मुंबईतील पाणी प्रश्नावर अनेक प्रकारचे आरोप
शिवसेनेवर करण्यात आले परंतु मुंबईला मिळणारे पाणी हे धरणातून येणाऱ्या पाण्यावर
अवलंबून आहे हे सर्वसामान्य मुंबईकरांना नक्कीच माहित आहे. उध्दवसाहेबांनी
मुंबईकरांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाईपलाईन बदलण्याचे काम हाती घेतले आहे,
भुमिगत बोगद्यांच्या माध्यमातून वेगाने पाणीपुरवठा व्हावा यावर काम सुरु आहे त्याचे
फोटो मधल्या काळात वर्तमानपत्रात आलेले आहेत. बेस्ट बसेसमध्ये 25 रुपयात कुठेही
प्रवास करण्याची मॅजिक पास योजना महानगर पालिकेच्या बेस्ट उपक्रमाचीच! याचा फायदा मागच्या
काळात लाखो मुंबईकरांनी घेतलाय सध्या दिवसाच्या मॅजिक पासचे दर वाढले असले तरी
मासिक पासमध्ये दिवसाला केवळ 18 रुपये मोजावे लागतात.
मुंबई महानगरपालिकेचे सर्वच प्रश्न सोडविण्यात शिवसेना यशस्वी झालीय
असे उध्दवसाहेब ठाकरे कधीच म्हणत नाहीत. मुंबईत अजून अनेक कामे करायची आहेत, ती
करण्यासाठी ज्यांनी यापूर्वी प्रयत्न केले आहेत त्यांच्यात हातात पुढील पाच वर्षे
सत्ता दिल्यासच ती कामे योग्य रितीने मार्गी लागू शकतील. नाहीतर युती सत्ताकाळात
महाराष्ट्रात झालेल्या विकासकामांची केवळ नावे बदलून श्रेय लाटण्याची कामे
कॉंग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांकडून झाली तसेच मुंबईत घडायला नको.
मुंबईत मराठी माणसाचीच सत्ता राहिली पाहिजे कारण मुंबईवर आदळणाऱ्या
परप्रांतिय लोंढ्यांमुळे मुंबईचे जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालेलं आहे. मनसे सारखे
पक्ष मराठी माणसाची मते मागताना शिवसेनेचा उमेदवार कसा पाडला जाईल यासाठी पुरेपुर
प्रयत्न करताना दिसत आहे. त्यांनाही जर कॉंग्रेस सत्तेत आली तर उभे राहणारे
प्रश्नांची जाणिव असलीच पाहिजे, परंतु अल्पकाळातील फायद्यासाठी ते थेट मुंबई
परप्रांतियांच्या घशात घालण्यासाठी शिवसेनेला विरोध करत आहेत. मनसेच्या अनेक नेत्यांनी 30 च्या पुढे जागा
येणार नाहीत याचा उल्लेख केलेला आहे. महानगरपालिकेत सत्तेत येण्यासाठी किमान 115
नगरसेवकांची आवश्यकता असते. मग आपले मत मनसेला देऊन कुठल्या प्रकारचा बदल
सर्वसामान्य मराठी माणसाच्या नशिबी येणार आहे?
मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष कृपाशंकर सिंग आणि राष्ट्रवादीचे मुंबई
अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांसारख्याच्या झोळीत आमच्या मुंबईतील मराठी मतदारांनी
मुंबईला द्यायचे का? मनसे हेच काम करतेय म्हणजेच यांचे कुणाशी साटेलोटे आहे हेही स्पष्ट
होतेय. म्हणून मतदारराजा, सावध रहा! कान आणि डोळे उघडे ठेवून मतदानाला बाहेर
पड. शिवसेना आणि महायुतीच्याच उमेदवारांना मतदान करून मराठी मुंबईच्या स्वप्नांना
धुळीस मिळवू नको!
No comments:
Post a Comment