Tuesday 11 January, 2011

क्रिकेट हरले, धंदा जिंकला


परवाच आयपीएलच्या खेळाडूंवर बोली लागली. अनेक खेळाडू विकले गेले. करोडोची माया या क्रिकेटपटूंनी गोळा केली. आयपीएलरुपी बाजार मांडला गेला असेल आणि त्यात क्रिकेटपटूंनी पैसे कमावणे हे चुकीचे नाही. प्रत्येक खेळाडू आपापल्या संघासाठी मेहनत करणार आहे त्याचाच हा मोबदला आहे. देशातील अनेक नविन खेळाडूंना यातून खुप मोठी संधी उपलब्ध झालेली आहे त्यांनी स्वत:ला सिद्ध केल्यास पुढील करियरसाठी नक्कीच हे महत्वाचे व्यासपीठ ठरेल. तरुण रक्ताला वाव देताना बिनकामाच्या म्हाताऱ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचे काम आयपीएल टीम मालकांनी केलेय. त्यातील नावे पाहिली तर हे खेळाडू म्हातारे असतील तर या मालकांसाठी पण जगातील क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत आहेत हे त्यांनी यापूर्वी सिद्ध केलेय. सौरव गांगुली, ब्रायन लारा आणि ख्रिस गेल. त्यातील प्रामुख्याने मोठा धक्का बसलाय तो सौरव गांगुली म्हणजेच दादाच्या फॅन्सना. 

दादा आणि ख्रिस गेल हे मागच्या हंगामात कोलकात्याकडून खेळले होते आणि ख्रिस गेल हा सर्वाधिक बोली लागलेल्या खेळाडूंमध्ये होता. यावेळेस या दोन्ही कोलकात्याच्या खेळांडूंवर अशी वेळ का आली असावी? कुणी म्हणतोय राजकारण झालेले असावे, सगळ्या मालकांनी मिळून दादाला खेळवायचे नाही असे ठरविले होते. यातले सत्य काय आहे हे आपल्याला कसे कळणार? पण दादाचा क्रिकेटमधील परफॉर्मन्स बघता त्याला असे वगळणे हे नक्कीच सोप्पे नव्हते.

आयपीएल हा व्यवसाय आपण धंदा आहे म्हणू या वाटल्यास! आपल्या देशातील क्रिकेटवेडी जनता हा खेळ म्हणून याकडे बघते तर संघ मालक केवळ धंदा म्हणूनच बघतात. सौरव गांगुली हा देशाचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. दादाच्या दादागिरीपुढे ऑस्ट्रेलियासुद्धा झुकली. आज आपला देश हा कसोटीतील नंबर एकचा ओळखला जातो त्याचे बीज दादानेच पेरले होते हे कुठलाही हिंदुस्थानी क्रिकेट चाहता मान्य करेल. दादाचा तसा आयपीएल मधला रेकॉर्ड सुद्धा खराब नाही.
कोलकात्याच्या संघ मालकांनी गौतम गंभीर (११ कोटी), युसुफ पठाण (९ कोटी) आणि जॅक कॅलिस (५ कोटी) असे तब्बल २५ कोटी या तीन खेळांडूंसाठी मोजलेत तर दादाची किंमत होती साधारण ४ कोटी. हि किंमत दादाच्या कारकिर्दीच्या मानाने जास्त होती असे कुणाला वाटत असेल तर ते पटण्यासारखे नाही.

आयपीएलसाठी जर क्रिकेटपटू संघ निवडणार असते तर दादा, लारा किंवा गेलला वगळू शकले नसते. हे तिघेही टी२० क्रिकेट चांगले खेळू शकतात. झपाट्याने रन्स वाढवू शकतात तरीही ते आयपीएलमध्ये नाहीत यामागचे काय कारण असू शकेल? ते सध्या कुठल्याही प्रकारचे क्रिकेट खेळले नाहीत? (गेल अजूनही खेळतोय) की वय झाले? इथे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे सर्वात चतुराई दाखविली ती अनिल कुंबळेने. स्वत:हून माघार घेऊन बाजूला राहिल्याने कुंबळेच्या वाट्याला दादासारखा अपमान आला नाही. आता कोलकात्यातील दादाच्या चाहत्यांनी केलेला गोंधळ पाहून कोलकाता संघमालक शाहरुख खान जागा झालेला आहे. म्हणे दादासाठी संघात जागा केली जाईल. कुठूण करणार आहे जागा?? आणि दादा आता त्याच्या संघात खेळेल? याची उत्तरे येणारा काळच देणार आहे.

3 comments:

PRASHANT said...

not a bengol tiger this is wold tiger

PRASHANT said...

not a bengol tiger this is wold tiger

Shubhankar Jadhav said...

अगदी खरं आहे...... कोणत्याही 'कलेची' किंमत पैशाने होऊच शकत नाही!!! दादा कडे, सचिन कडे क्रिकेट खेळण्याची कला आहे जी कधीच कोणत्याच रकमेत नाही मोजू शकत!!!!