Thursday 13 January, 2011

तुम्ही क्लिन आहात, पण तुमच्या मंत्र्यांचे काय?


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रात आल्यानंतर अनेक आश्वासने देण्याचा सपाटा लावत सुटले आहेत. ‘आदर्श घोटाळ्या’च्या पार्श्वभूमीवर श्री. पृथ्वीराजांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळाले असल्याने छाप पाडण्यासाठी तसेच आपली क्लिन प्रतिमा कायम ठेवण्यासाठी सतत भ्रष्ट्राचाराविरोधात भूमिका घ्यावीच लागणार आहे. 

आपल्या देशाचे पंतप्रधान श्री. मनमोहनसिंग हे सुद्धा मिस्टर क्लिन म्हणून ओळखले जातात. विरोधकसुद्धा त्यांना याच नावाने संबोधतात तसेच काहीसे पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत बोलले जाते. अनेक वर्षांनी महाराष्ट्राला कॉंग्रेसने दिलेला चेहरा लोकांच्या पसंतीस उतरला. सरळ आहे एवढ्या मोठ्या घोटाळ्यामुळे मुख्यमंत्रीपद मिळाले असल्याने त्यांच्या मंत्रीमंडळात भ्रष्ट्राचारी मंत्रींवर लक्ष ठेवावे लागणार आहे.

पृथ्वीराजांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यानंतर सर्वात पहिली घोषणा केली ती स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनाच मंत्री करणार. या घोषणेने कॉंग्रेसमधील अनेकांचे धाबे दणाणले. नुकतेच मुख्यमंत्रीपदासाठी धावपळ करणारे नेते आता मंत्रीपद मिळण्यासाठी दिल्लीसाठी रवाना झाले. भ्रष्ट्राचारी नेते आता अडगळीत जाणार असे लोकांना वाटू लागले पण लोक एक विसरले की पृथ्वीराज जरी चांगले नेते असले तरी ते कॉंग्रेसचे नेते आहेत. मनमोहनसिंगांसारखेच पृथ्वीराजांच्या हातात फक्त मुख्यमंत्रीपद आहे, त्यांना कामे ही सोनिया गांधींच्या म्हणण्यानुसारच करावी लागणार आहेत. आणि पृथ्वीराजांच्या पहिल्या घोषणेचेही तीन-तेरा वाजले. नारायण राणे पासून अनेक् भ्रष्ट्राचाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान मिळाले.

कालच पृथ्वीराजांनी म्हटलेय की, भ्रष्ट्र राजकारणी, बिल्डर आणि प्रशासकीय मंडळींनी मुंबई विकायला काढलीय. मिडीयामध्येही याला चांगली प्रसिद्धी मिळाली. मुख्यमंत्री हे बोलत असल्याने सध्याच्या कॉंग्रेसचे सरकार भ्रष्ट्राचारी आहे हे सिद्ध होतेय. पण नुसते बोलून काय होणार आहे. मुख्यमंत्री या सरकारचे प्रमुख आहेत जी कोणी मंडळी मुंबईचे लचके तोडत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना घटनेने दिलेले आहेत. आजपर्यंत मनमोहन सिंगांनी केलेली अशी वक्तव्ये आपण पेपर आणि मिडीयामधून ऐकली आहेत पण त्याने केंद्रातील भ्रष्ट्राचार कमी झालेला नाही. आपले दुर्दैव हेच की आज देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रमुखपदी अतिशय चांगल्या प्रतिमेचे लोक बसले आहेत पण ते भ्रष्ट्राचार कमी करु शकतील याची जनतेला बिल्कुल खात्री नाहिये.
पृथ्वीराज बोलले पण पुढे काय? आजच्या केंद्रसरकारमध्ये अनेक घोटाळेबाज नेते आहेत तसेच महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात सुद्धा काहीशी तशीच परिस्थिती आहे. पण यावर आवर घालायला दोन्ही प्रमुखांची तयारी नाही कारण ते आपल्या कर्तुत्वाने प्रमुखपदी आलेले नाहीत त्यांना सोनिया गांधींनी प्रमुख केलेय.

No comments: