Friday 22 April, 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ३)

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रमया लेखमालिकेतील दुसरा भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा व आता पुढे...

अणु आस्थापनांची गोबेल्सनिती

दि. १३ जानेवारी २०१० च्या वृत्ताप्रमाणे मुंबईतील गिरगांव येथे सुशिक्षितांच्या उपस्थितीत मॅजेस्टिक गप्पांच्या कार्यक्रमात काकोडकरांनी सांगितले की, थेरिअमपासून ऊर्जानिर्मिती करण्यास भारत युनिक आहे. यातून असा भास होतो की, जणूकाही खरच भारत अशी वीजनिर्मिती करत आहे. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. उलट युरोप, अमेरिकेने प्रचंड खर्च व अत्यंत धोकादायक दुर्घटनांमुळे अशा प्रयत्नांचा नाद सोडला आहे.

वृत्तपत्रांत दापोली कृषी विद्यापिठाने जैतापूर प्रकल्पास हिरवा कंदिल दिला असे वृत्त प्रसिध्द झाले होते. याबाबत माडबनच्या डॉ. वाघधरे यांनी माहिती अधिकाराखाली विचारणा केली. तेव्हा विद्यापिठाने स्पष्ट केली की त्यांच्याकडे फक्त वनस्पती आणि प्राणी यांच्यासंदर्भातील केवळ माहिती देण्याचे काम दिले गेले होते. त्यांना पाठिंबा दिलेला नाही अथवा विरोधही केलेला नाही. हिरवा कंदिल देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

अणुशक्ती महामंडळाला (NPCIL) आपण देशातील कायद्यांपेक्षा, घटनेपेक्षा मोठे आहोत असे वाटते. जनसुनावणी झाल्यानंतर पर्यावरण व वन मंत्रालयाचा निर्णय येणे अपेक्षित असताना, त्यापूर्वीच मंडळाचे अधिकारी श्री. जैन यांनी जाहिर केले की ते १ जुलै रोजी प्रकल्पाचे काम सुरु करणार. यातून घटनाविरोधी व लोकशाहीविरोधी वृत्ती स्पष्ट होते.

पेंडसे-कद्रेकर समिती अहवाल – २००६

या सरकारच्या अहवालाने स्थानिक जलप्रवाहावर छोटी वीज केंद्रे निर्माण करून कोकणात चार हजार मेगावॅट वीज निर्माण करता येईल हे दाखविले आहे. कोकणाची (रत्नागिरी, सिंधुदुर्ग) स्वत:ची वीजेची गरज फक्त सुमारे १७० मेगावॅट एवढीच आहे हे लक्षात घेतले पाहिजे. सरकारने कोकणातून ४२००० मेगावॅट वीजनिर्माण करण्याचे ठरविले आहे. (औष्णिक १२ प्रकल्प ३२००० मेगावॅट, आण्विक १०००० मेगावॅट) देशातील एकूण उत्पादनाच्या सुमारे ३० टक्के वीजनिर्मितीमुळे कोकण अक्षरश: भाजुन निघणार आहे. महाराष्ट्रातील वीजेची तुट फक्त ४००० मेगावॅट आहे. तीदेखील दुर करण्याचे इतर मार्ग आहेत.

अणुऊर्जा ग्लोबल वार्मिंगच्या समस्येचे उत्तर नाही

वीज निर्मितीच्यी दृष्टीने अनुत्पादक – वीजनिर्मितीसाठी वापरलेल्या वीजपेक्षा उत्पादित वीज कमी. खनीज इंधनाएवढे वा त्यापेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन, शिवाय किरणोत्सार. युरोपियन संसदेने सन २००४ मध्ये अणुऊर्जेद्वारे वीज निर्माण करताना होणा-या कार्बन डाय ऑक्साइडच्या उत्सर्जनाचा अभ्यास केला. डॉ. विलेम स्टॉर्म आणि डॉ. फिलीप स्मिथ या शास्त्रज्ञांनी केलेल्या या उत्कृष्ट अभ्यासात आढळले कि, जगात सर्वत्र साधारणपणे आढळणारे युरेनियम खनीज वापरल्यास फक्त खाणीतून युरेनियम काढणे, युरेनियम दळणे, युरेनियम समृध्द करणे एवढ्याच प्रक्रियांत होणारे कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन हे कोळसा, तेल अथवा वायु वापरून केलेल्या वीजनिर्मितीत होणा-या कार्बन डाय ऑक्साईडच्या ऊत्सर्जनी एवढे असते.

ज्वलनशील कोळसा,  तेल व वायु मिळवणे हि तुलनेने अत्यंत सोपी गोष्ट ठरते. परंतु भंजनशील अणूच्या रूपातील युरेनीयम मिळवणे ही अत्यंत कठीण व धोकादायक प्रक्रिया आहे. ही गोष्ट अणूचे समर्थक लपवतात. वरील अभ्यासात दिसले की, टाकाऊ इंधनावरील पुर्नप्रक्रिया, अणुभट्टीची बांधणी, ती मोडीत काढणे आणि पुढील लाखो वर्षासाठी किरणोत्सारी द्रव्ये व इतर पदार्थांचे मानव, इतर सृष्टी पर्यावरणाच्या संपर्कात येऊ न देता जतन करणे यासाठी करावे लागणारे बांधकाम आणि या सर्व काळात होणारी वाहतुक यासाठी वापरली जाणारी कोळसा, तेल व वायु ही इंधने प्रचंड प्रमाणात कार्बनचे उत्सर्जन करतात. मिथेन, नायट्रोजनची ऑक्साईड आणि कार्बन डाय ऑक्साईच्या सुमारे वीस हजार पटीने जास्त प्रमाणात पृथ्वीला तापवण्यास कारणीभूत ठरणारी क्लोरोफ्लुरोकार्बन्स ही द्रव्ये जमेस धरली तर अणुऊर्जा कोळसा, वायु वा तेलापेक्षा फार मोठ्या प्रमाणात हरितगृह परिणाम करणा-या म्हणजे तापमानवाढीस व वातावरणातील बदलास कारण ठरणा-या वायुंचे उत्सर्जन करते. यासाठी अणु इंधन चक्र किंवा युरेनीयम इंधन चक्र ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. परंतु अणुचे समर्थक ही जगातील सर्वांना मान्य असलेली संकल्पनाच नाकारतात आणि भंजनाच्या क्रियेत कार्बन उत्सर्जन होत नाही अशी बालीश परंतु लबाड भूमिका घेतात. विंडस्केल, थ्री नाईल्स आयलंड, चेर्नोबिल, चेल्याबिन्स्क, हॅनफोर्ड अशा अनेक ठिकाणच्या दुर्घटनेनंतर अणुऊर्जेला युरोप-अमेरिकेतील जनता नाकारत आहे. अशावेळी या दशकांत जागतिक तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर अणूऊर्जेला पुढे रेटण्याचा प्रयत्न सुरू झाला. मात्र हा फुगा लवकरच फुटला आणि युरोप, अमेरिकेतील जनमत जागृत झाले. मात्र भारतात हाच असत्य प्रचार जोमाने सुरू आहे.  ही दुर्दैवाची बाब आहे.

क्रमश:

No comments: