Saturday, 23 April 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ४)

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रमया लेखमालिकेतील मागिल भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा व आता पुढे...

अणुवीजेचा वाटा नगण्य

कोळसा, तेल व वायु या ऊर्जास्त्रोतांचा इतर कारणांसाठी इंधन म्हणून सरळ वापर करता येतो. उदा. वाहतुक, अन्न शिजवणे, जळण-सरपण इ.  तसे अणुबाबत करता येत नाही. या स्त्रोतांचा वीज निर्माण करण्यासाठी झालेल्या वापरापेक्षा इतर कारणांसाठी, उपयोगासाठी झालेला वापर खुप जास्त असतो. वीज उत्पादन हा एकूण ऊर्जा वापरापैकी एक छोटा भाग आहे. ऊर्जेच्या वापराचा छोटा भाग असलेल्या वीज उत्पादनातही अणुपासून निर्माण होणा-या वीजेचा वाटा अल्प आहे. म्हणजे एकूण वीज वापरात अणूचा वाटा नगण्य आहे. गेल्या साठ वर्षात त्याच्या मर्यादांमुळे अणू मोठी कामगिरी पार पाडू शकला नाही. अणूच्या अत्यंत धोकादायक स्वरूपामुळे हे होते. ते नकळत माणसाच्या हिताचेच आहे. परंतु तो मोठी भुमिका पार पाडत असल्याचा आव आणला जातो आणि त्यावर पैशाची अक्षम्य उधळपट्टी करून मानवासह सृष्टीला कार्बन ऊत्सर्जन व किरणोत्सार असा दुहेरी धोका निर्माण केला जातो.

अणुऊर्जा हि वीज उत्पादनाच्या दृष्टीने अनुत्पादक

वरील शास्त्रज्ञांच्या तसेच ऑक्सफर्ड रिसर्च ग्रुपसारख्या इतरही अभ्यासात आढळले आहे की, अणूऊर्जेद्वारा वीज निर्माण करताना खर्च होणारी वीज ही निर्माण होणा-या वीजेएवढीच किंवा त्याहून जास्त असते. अर्थात अणूऊर्जा हि वीजनिर्मितीच्या दृष्टीने अनुत्पादक आहे.

किरणोत्साराचे आरोग्यावरील व इतर जैविक दुष्परिणाम

डॉ. मॅनफुसो यांनी हॅनफोर्ड येथील पुर्नप्रक्रिया उद्योगातील कामगारांच्या मृत्यूचा किरणोत्साराशी असलेला संबंध सिध्द करणारा अभ्यास केला. हा अमेरिकन संरक्षण खात्याचा अभ्यास आहे.

डॉ. गॉफमन आणि डॉ. टँपलीन यांनी अमेरिकन सरकारतर्फे केलेला अण्वस्त्रचाचणीच्या किरणोत्सारामुळे अर्भकांचे मृत्यू होत असल्याचे सिध्द करणारा अहवाल.

डॉ. अलिस स्टुअर्ट यांचा गर्भवती स्त्रीयांवर व अर्भकांवर होणारा किरणोत्साराचा व क्ष किरणांचा दुष्परिणाम दाखविणारा अभ्यास.

डॉ. एडवर्ड गार्डन यांचा कॅनडाच्या सरकारतर्फे केला गेलेला मानवी आरोग्यावरील व सजीवांवरील किरणोत्साराच्या घातक दुष्परिणामांबाबतचा अहवाल.

डॉ. सुरेंद्र गाडेकर यांचा रावतभाटा व जादुगोडा येथील किरणोत्सार व आजारांच्या संदर्भाचा अभ्यास. कल्पक्कम  अणुकेंद्राच्या किरणोत्सारामुळे होणा-या कॅन्सरबाबतचा डॉ. पुगाझेंथी व सहका-यांचा अभ्यास.

असे अनेक अभ्यास उपलब्ध आहेत. ते निर्विवादपणे अणूऊर्जेची घातकता सिध्द करतात.
पुढील ग्रथांनी अणूऊर्जेचे भीषण स्वरूप स्पष्ट केले आहे.

डॉ. हेलन कॉल्डीकॉट यांचे न्यूक्लिअर मॅडनेस आणि न्यूक्लिअर पावर इज नॉट द आन्सर व इतर ग्रंथ

डॉ. रोझेली बर्टेल यांचे इमिजिएट डेंजर व इतर ग्रंथ

डॉ. अर्जून मखिजानी यांचे कार्बन फ्री एण्ड न्यूक्लिअर फ्री

लर्डॉ. मखिजानी व स्कॉट सालेस्का यांचे हाय लेव्हल डॉलर्स- लो लेव्हल सेन्स

पीटर प्रिंगल आणि जेम्स स्पीगलमन या पत्रकारांचे द न्यूक्लिअर बॅरान्स

जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे डॉ. धीरेंद्र शर्मा यांचे इंडियाज न्यूक्लिअर इस्टेट

केन्झाबुरो ओए यांचा १९९४ नोबेल पुरस्कारप्राप्त ग्रंथ द हिरोशिमा नोटस

ग्रीनपीस सारख्या संघटनांनी अणूऊर्जेच्या प्रत्येक अंगावर अभ्यास अहवाल बनविले आहेत.

२००९ सालात ग्रीसमध्ये लेसव्हॉस येथे नामवंत किरणोत्सार तज्ञांची परिषद झाली. तेथे जनुके, गुणसुत्र व पेशींवरील होणा-या दुष्परिणामांची नवी माहिती पाहता आतापर्यंतची सर्व मानके कालबाह्य ठरली. लेसव्हॉसचा जाहिरनामा प्रदर्शित झाला. महत्वाचे म्हणजे किरणोत्साराची कोणतीही किमान सुरक्षापातळी नाही. हे पुन्हा अधोरेखित झाले.

तारापुर अणूऊर्जा प्रकल्पाचे गावांवरील दुष्परिणाम. घिवली, उच्छेली, दांडी व इतर गावे आरोग्याबाबत निरिक्षण

-    कॅन्सरचे मोठे प्रमाण

-    सकाळी उठल्यावर ग्लानी, ताजे वाटत नाही.

-    अंग दुखत असते, थकवा सतत वाटतो.

-    मासिक पाळी रक्तस्त्राव १०-१५ दिवस सतत होत राहतो.

-    वंध्यत्वाचे मोठे प्रमाण

-    मृत बालकांच्या जन्माचे मोठे प्रमाण

-    मेंदूवर दुष्परिणाम ५५-६० वर्षाच्या वयात दिसतो.

-    मानसिक संतुलन बिघडले.

-    मतिमंदत्व

-    लहान मुलांत हात, पाय, सांधेदुखीचे प्रमाण मोठे

-    मूत्रपिंड व इतर इंद्रिये निकामी होणे

-    मासे तपासणीसाठी नेले जातात परंतु त्याचे निष्कर्ष कधीही  सांगितले जात नाहीत.

-    किरणोत्साशी संबंधित कामासाठी अनेक तास राबवले जाते.

-    सागरातील मासळी संपली आहे. थोडक्यात येथील ग्रामस्थांचे मत आहे की, आम्ही उध्वस्त झालो आहोत. हे आजार पालघर, डहाणू परिसर व ठाणे जिल्ह्यावर पडलेले किरणोत्साराचे सावट स्पष्ट करतात.  याशिवाय या प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या उपजिवीकेच्या, पुनर्वसनाच्या, नागरी सेवा सुविधांच्या, गावांच्या बकाल होण्याच्या इ. समस्या आहेत.

क्रमश:

No comments: