Sunday, 6 November, 2011

राष्ट्रवादीचे श्रीवर्धनमधील ‘मिशन तंटा’


श्रीवर्धन हे कोकणातील निसर्गरम्य ठिकाण. श्रीवर्धनच्या उत्तरेला मुरुड-जंजिरा, दिवेआगर, श्रीवर्धन शहर, दक्षिणेला सुप्रसिध्द हरिहरेश्वर मंदिर तसेच अतिशय स्वच्छ आणि देखणे समुद्र किनारे अशीच ओळख करुन देता येईल. स्वातंत्र्यापासून गेली अनेक वर्षे कोकणातील इतर भागाप्रमाणे राज्य सरकारकडून दुर्लक्षीत असेच हे ठिकाण होते. श्रीवर्धन मतदारसंघातून या राज्याला बॅरिस्टर अंतुलेंसारखे मुख्यमंत्री मिळाले. तरीही श्रीवर्धनची पहिली ओळख जगाला मिळाली ती १९९२ साली शेखाडी बंदरावर उतरले गेलेल्या जीवंत काडतूसांमुळेच.

स्वातंत्र्यानंतर ते १९९५ सालापर्य़ंत श्रीवर्धनमध्ये सातत्याने कॉंग्रेसचीच एकहाती सत्ता होती. स्वातंत्र्यानंतर जवळपास ५० वर्षे इकडे रस्ते, पाणी आणि वीजेचे अनेक प्रश्न लोकांना भेडसावत होते. आपण लोकप्रतिनीधींना विभागाचा विकास करण्यासाठी निवडून देतो, याबद्दल कदाचित तिथल्या जनतेला माहितीसुध्दा नसावी, इतकी भयानक अवस्था माजी मुख्यमंत्री अंतुलेसाहेबांच्या श्रीवर्धनची होती.

पण १९९५ नंतर श्रीवर्धनचे रुपडेच पालटून गेले. शामभाई सावंतांच्या रुपाने पहिला शिवसेनेचा आमदार या विभागाला मिळाला. श्रीवर्धनच्या सुदैवाने त्याचकाळी शिवसेनेची महाराष्ट्रात सत्ता आली. याआधी झालेली कोकणचा वाताहत बाळासाहेबांनी रोखली. कोकणात अनेक प्रकारची विकासकामे करण्याचे आदेश बाळासाहेंबांनी दिले. श्रीवर्धनचाही विकास झपाट्याने सुरु झाला. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणी-पुरवठ्याची कामे हाती घेतली गेली. वीज नसलेल्या ठिकाणी वीज पोहचली, पायवाटेप्रमाणे असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. श्रीवर्धन शहराकडे जाण्यासाठी प्रत्येक गावात एसटी सुरु केली गेली. अतिदुर्गम गावांकडे शिवसेनेचा आमदार स्वत: जाऊन तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करु लागला. आमदार आल्यानंतर शिवसेनेकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीही जनतेने दिली. गावांच्या विकासाला आणखी गती मिळाली, पर्यायाने हा विभाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाऊ लागला.

मागच्या विधानसभा निवडणूकीत एक अपघात झाला. श्रीवर्धन मतदार संघांची फेररचना झाली आणि गोरेगांव-मुरुड सारखा भाग मतदार संघातून वगळून माणगाव, तळा व रोहा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे असलेला मोठा भाग या मतदारसंघाला जोडला गेला. श्रीवर्धनमधील जनतेला पैशांची भुल पाडून जास्तीत जास्त मतदान आपल्याकडे खेचण्य़ात सुनिल तटकरेंना यश मिळाले व हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेला. पारंपारिक शिवसेनेच्या मतदानामध्ये काहीसा फरक झाला होता. श्रीवर्धनमध्ये अजूनही शिवसेनेचीच मोठी ताकद आहे. तटकरे हे सरकारमध्ये मंत्री असल्याने प्रशासकीय अधिकारी त्यांना दचकून असतात. परंतु खासदार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ही शिवसेनेकडेच असल्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून सुरु असलेली विकासकामे तशीच सुरु आहेत. त्याचवेळेस दोन वर्षे आमदारकीला होऊनही विकासकामांची फक्त उद्घाटने उरकली गेली आहेत, अजूनपर्यंत कामे काही होत नाहीत, निवडणूकांच्या काळात दिघी पोर्ट मध्ये नोकरीसाठीचे खोटे अर्जही भरले गेलेत, दिघी पोर्टचे अजून बरेच काम बाकी असल्याने इतक्यात तरी नोकऱ्यांसाठी भरती होणार नाही हे सत्य आहे, आणि जेव्हा भरती सुरु होईल तेव्हा ती फक्त राष्ट्रवादीच्याच लोकांकडून होणार नाही हेही सत्य आहे.

श्रीवर्धनमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बाजूने न लागल्यास तटकरेंचे मंत्रीपद काढले जाऊ शकते, परिणामी तटकरेंची राजकीय कारकिर्द धोक्यात येऊ शकेल अशा प्रकारे बोलले जात आहे. म्हणून तटकरेंनी श्रीवर्धनमध्ये वेगळ्याच प्रकारचे राजकारण सुरु केले. गेली ५० वर्षे अतिशय शांतता असलेल्या गावांमधील काही विकाऊ लोकांना हाताशी धरून गावागावात तट (तट-करे नावातच सारे काही आहे) पाडण्याचे एककलमी कार्यक्रम आखण्यात आला आहे. पैसा आणि लोकांना दारू पाजून गावांचे आरोग्य खराब करण्याचे काम तटकऱ्यांच्या जुन्या मतदार संघात म्हणजेच माणगाव-तळ्यात केले होतेच. याच कारणाने मागच्या आठवड्य़ात श्रीवर्धन मतदार संघातील कादंळवाडा या गावाने राष्ट्रवादी पक्षाला गावबंदीचा निर्णय घेतलाय. श्रीवर्धनमधील १०० टक्के शिवसेनेला मतदान करणारे गाव म्हणून ओळख असलेल्या धारवली या गावानेही आता शिवसेना सोडून राष्ट्रवादीसहीत इतर सर्व पक्षांना कायमस्वरुपी गावबंदी घातली आहे आणि अशाप्रकारचे निर्णय नजिकच्या काळात इतर गावेही घेतील अशी शक्यता नाकारता येणार नाही.

आपापले राजकारण करताना गावा-गावांत शांतता प्रस्थापित करणे हे खरे लोकप्रतिनीधीचे काम आहे, इथेतर तटकरे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तंटामुक्ती अभियान राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच आणले परंतु अशा प्रकारे आपल्या पक्षाकडे लोक वळणार नसतील तर पैशाच्या जोरावर त्या गावाचे तुकडे पाडून गावातील कायमस्वरुपी अशांतता राबविण्याचे सगळीकडे जोरदार सुरु आहे. प्रत्यक्ष पोलिस स्टेशनला भेट दिल्यास हे ‘मिशन तंटा’ उपक्रमाची सत्यता उलगडेल. इतकी वर्षे शिवसेना, कॉंग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष या विभागात काम करत आहे. हिंदु-मुस्लिम दंगेही या विभागात झालेले आहेत. परंतु तालुक्यात अशा प्रकारचे धोरण कुठल्याही पक्षाने राबविले नाही.

गावकऱ्यांना या अशा घाणेरड्या राजकारणाचा वास आता येऊ लागला आहे ही श्रीवर्धनच्या भविष्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. आपापले गाव सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येक गाववाल्यांचीच आहे. इतकी वर्षे समर्थपणे चालणारे गाव आता अशा राजकारण्यांच्या दावणीला बांधण्यात काहीच फायदा नाही. पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या अशा पुढाऱ्यांना गावबंदीमुळे तरी अक्कल येईल का?

No comments: