Wednesday 5 January, 2011

फेसबुक वापरा पण त्याच्या आहारी जाऊ नका


फेसबुकचा ५० कोटीपेक्षा जास्त लोक वापर करतात. त्यातले ५०% म्हणजेच जवळपास २५ कोटी लोक रोज न विसरता फेसबुकला भेट देतात. फेसबुक ही जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग वेबसाईट मानली जाते. आजची तरुणाई तर हल्ली सतत ऑर्कुट/फेसबुक/ट्विटर सारख्या माध्यमांवर्च रमलेली असते. सकाळ-संध्याकाळ ते अगदी झोप येईपर्यंत फेसबुकवर आपले स्टेट्स, कमेंट्स देण्यात गुंग झालेले असतात.

सोशल नेटवर्किंग ही आता इंटरनेटवरील खुप मोठी शक्ती म्हणून पुढे येत आहे. कॉर्पोरेट्सपासून ते छोट्या कंपन्यांपर्यंत सर्वजण सोशल नेटवर्किंग साईटसचा वापर आपला बिजनेस वाढवण्याकरिता करत आहेत. यामागची कारणे वरील आकडे आहेत. आपण ज्यांच्यासाठी प्रोडक्ट बनवतोय ते जर सोशल नेटवर्किंगसारख्या माध्यमांवर भेटणार असतील तर यापेक्षा मार्केटींगची मोठी संधीच असू शकत नाही हे समजायला या कंपन्यांना वेळ गेला नाही.

परंतु आपण आपला जो वेळ फेसबुकवर घालवतोय तो आपल्या आयुष्यातील अतिशय महत्वाचा आहे हे आपल्या ध्यानात आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री ’गुड नाईट’ म्हणेपर्यंत आपले आयुष्य जर का फेसबुकवर जाणार असेल तर ते आपल्या आयुष्यासाठी घातक आहे. आपल्याला रोज अनेक कामे करायची असतात. शाळा, कॉलेज, नोकरी, गृहीणींना घरातील कामे, व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय. अशा कामांकडे दुर्लक्ष करुन आपण सतत फेसबुकचा विचार तर करत नाही ना? आपल्या कम्प्युटरपासून दूर असताना आपण सतत आपल्या स्टेटस किंवा कमेंटसचा विचार करत नाही ना? मोबाईलवरुन फेसबुक ऍक्सेस करण्याची आपल्याला सवय तर जडलेली नाही ना? जर असे काही होत असेल तर आपण फेसबुकच्या आहारी गेला आहात म्हणजेच आपल्याला ते व्यसन लागले आहे असे म्हणता येईल.

आपण जर फेसबुकच्या आहारी गेला असाल तर एखादे व्यसन सोडणे जितके कठीण असते तितकेच हेही व्यसन सोडणे कठीण आहे. पण ते सुटू शकत नाही असे मात्र नक्कीच नाही.
फेसबुकशी काहींचा संबंध व्यवसाय म्हणून येत असतो. पण तेही करताना त्यासाठी ठराविक वेळच दिला गेला पाहिजे. आपल्या व्यावसायिक फॅन पेज वर एखादा स्टेट्स अपडेट करण्यासाठी काही मिनीटे लागतात तेवढे झाल्यावर २-३ तासांनी कमेंट वाचणे आणि त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी अर्धातास पुरे व्हायला हवा. 

विद्यार्थी किंवा जे लोक फेसबुकचा वापर मित्र-मैत्रीणींना भेटण्यासाठी, त्यांच्याशी बोलण्यासाठी करतात अशांनी स्वत:वर काही निर्बंध घालणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त वेळ फेसबुकपासून दूर राहण्यासाठी इतर गोष्टींमध्ये मन रमविणे कधीही चांगले. वाटल्यास एखादा दिवस फेसबुकवर न जाता कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रोग्राम केल्यास हळू हळू आपण या व्यवनातून मुक्त होऊ शकाल.
तंत्रज्ञान हे जीवन नक्कीच नाही. तंत्रज्ञानाचा वापर आपल्या आयुष्यातली कामे हलकी करण्यासाठी केला गेला पाहिजे. सोशल नेटवर्किंग किंवा फेसबुक हे वाईट नक्कीच नाही. सोशल नेटवर्किंगमुळे आपल्या अनेक नवनविन ओळखी होतात, मित्र भेटतात, बिझनेस कॉन्टॅक्ट वाढतात, कामे मिळतात तर याचा वापर चाणाक्षपणे केला गेला पाहिजे.

No comments: