Thursday 21 April, 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग २)

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रमया लेखमालिकेतील पहिला भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा व आता पुढे...

सागरी जीवनावरील दुष्परिणाम

NPCIL नेच येथे १००० मेगावॅट क्षमतेची अणुभट्टी केल्यास त्याचा सागरी जीवनावर काय परिणाम होईल याचा अभ्यास १९८९-९० सालात भारतीय सागर विज्ञान संस्थेकडून करून घेतला. या अहवालात असे नमूद केले आहे की, येथे उत्कृष्ट आणि मुळ रूपात असलेले सागरी जीवन आहे. प्रकल्पाने सागरातील पाणी घेऊन ते गरम करून परत सागरात सोडल्यास या सागरी जीवनाचा पूर्ण नाश होईल. तापमानातील थोडाही फरक मस्त्यसृष्टी सहन करू शकत नाही.
जैतापूर प्रकल्पात रोज ५२०० कोटी लीटर पाणी सागरातून घेऊन भट्टी थंड करण्यासाठी वापरून सुमारे १२ अंश सेल्सिअस एवढ्या वाढलेल्या तापमानाने परत सागरात सोडले जाईल. या पार्श्वभूमीवर प्रकल्प रद्द करणे आवश्यक असताना तसे न करता उलट पूर्वीपेक्षा दहापट क्षमतेच्या सहा भट्टयांचा (१६५० मेगावॅट प्रत्येकी) प्रकल्प हाती घेतला आहे.

वरील अहवालाचा उल्लेखही न करता CWPS (Central Water and Power Research Station) या संस्थेकडून अलिकडे दुसरा अहवाल बनवून घेतला आहे. मुळात ही संस्था अभियांत्रिकी स्वरुपाची आहे. ही संस्था सागराचा प्रत्यक्ष अभ्यास करत नाही. ती पुण्याला प्रतिकृतीवर (Model) अभ्यास करते. हीच मुळात अवैज्ञानिक गोष्ट आहे. या संस्थेने इतरत्र केलेले अहवाल चुकीचे व हानीकारक असल्याचे सिध्द झालेले आहे. या संस्थेने जैतापूर प्रकल्पाबाबत केलेल्या अहवालात राजापूर आणि विजयदुर्ग या दोन महत्वाच्या खाड्यांची दखल घेतलेली नाही. हा अहवाल आणि प्रकल्प दोन्ही अयोग्य आहेत.
मुंबई नॅचरल हिस्टरी सोसायटीने गेल्या काही महिन्यात कोकणच्या किना-यांचा व सागराचा जैवविविधता अभ्यास केला. त्यात या प्रकल्पक्षेत्राजवळील सागरात उत्कृष्ट जैवविविधता असल्याचे नमूद केलेले आहे. याच संस्थेने माडबन येथील जैवविविधतेचा देखील अभ्यास केला. त्यात जमीनीवर तसेच जमीन व सागराचा दुवा असलेल्या क्षेत्रात तिवरांमध्ये असाधारण जैविक विविधता आढळली.

इतरही शास्त्रज्ञांनी माडबन परिसर व तेथील सड्यावरील गवत व इतर वनस्पती व प्राणीजीवनाच्या समृध्दीचा अभ्यास केला. नॅशनल जिओग्राफिक ने पश्चिम घाटातील जैविक विविधतेची माहिती दिलेली आहे. सागरी व इतर प्राणी जीवनावरील जगभरातील अभ्यासानी किरणोत्साराने होणारे दुष्परिणाम नोंदले आहेत.

सागर हि प्रत्येक कण गतीमान असलेली परिसंस्था आहे. त्यामुळे येथील किरणोत्साराचा प्रसार महाराष्ट्राच्या विस्तृत किनारपट्ट्यांवर व आतील सागरात होणार आहे. प्रदुषित मासळी अन्नात येणार आहे. आज औद्यागिकरणामुळे मुंबईतील नद्या, खाड्या व सागर मृत झालेले आहे. कोकणच मुंबईसह इतर वाढलेल्या लोकवस्तीच्या भागांना मासळी पुरवत आहे. यापुढे कोकणचाही सागर मृत झाल्याने प्रथीनांचा मोठा पुरवठा करणारा मासळी हा चविष्ट अन्नघटक दुर्मिळ व अतिशय महागडा होणार आहे.

या अभ्यासांना कोकणच्या प्रकल्पांचा निषेध केला आहे. जैतापूर अणुऊर्जा केंद्राचे दुष्परिणाम तर किरणोत्सारामुळे पुढील अनंत काळासाठी जीवजातींना भोगावे लागणार आहे.

अणुऊर्जेबाबतचे खोटे दावे.

सत्य : अणुऊर्जेची वीजनिर्मिती नगण्य, फक्त २.७ टक्के. अणुवीज सर्वात महागडी

गेल्या दोन वर्षातील देशातील वीज उत्पन्नाबाबतची सत्यस्थिती

वर्ष
एकूण वीज उत्पादन
मे. वॅ.
नूतनीकरण स्त्रोत
मे. वॅ.
अणूऊर्जा
मे. वॅ.
२००९
१४७०००
१३२४२
४१२०
२०१०
१६७०७७
१६७८६
४५६०

ही आकडेवारी बोलकी आहे. अणुऊर्जेवर नगण्य वीज उत्पादनासाठी प्रचंड खर्च केला गेला. त्यातून कार्बन व किरणोत्साराचे भयानक प्रदुषण निर्माण झाले. मात्र सौर, पवन, जैविक, लघुजलविद्युत, घनकचरा इ. नूतनीकरणक्षम पर्यायी ऊर्जास्त्रोतांमुळे सुमारे चारपट जास्त वीज निर्माण झाली तीदेखील चारपट खर्च कमी करून. निवड स्पष्ट आहे. देशाने नूतनीकरनक्षम, प्रदुषणरहित, धोका नसलेल्या ऊर्जास्त्रोतांकडे वळले पाहिजे.

अणुऊर्जेला गेली साठ वर्षे लाडावले गेले आहे. उलट फक्त गेल्या वीस वर्षात आणलेल्या प्रदुषणरहित नूतनीकरणक्षम पर्यायी ऊर्जास्त्रोतांनी त्याची आर्थिक आबाळ होत असतानाही उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे.

मॅसाच्यूसेट तंत्रज्ञान संस्थेचा अहवाल

स्त्रोत
कोळसा
वायु
अणुवीज देशी
अणुवीज आयात
वीजदर प्रती एक रू
२.३७
२.४४
३.६०
५.००
प्रतीमेगावॅट भांडवली खर्च रू. कोटीमध्ये
३.७६
३.००
७.७४
११.२३

वरील तक्त्यावरून अणूवीज महाग आहे हे स्पष्ट होत आहे.  वरील आकडेवारीत छुपे खर्च आणि अनुदाने धरलेली नाहीत. ती धरली तर अणुवीज याहुन खुप महाग आहे.

अणुऊर्जा हा पांढरा हत्ती आहे. हे लक्षात येत नाही कारण या वीजेची किंमत ख-या अर्थाने नागरीक बिलातून नव्हे तर करातून भरतो. अणूउद्योग देशाचा प्रचंड पैसा गिळंकृत करतो. जनतेचे अज्ञान आणि बधीरपणा हे अणूउद्योगाचे खरे भांडवल आहे.

उपाय व पर्याय

१.      नूतनीकरणक्षम – अकार्बनी किरणोत्साररहित अक्षय ऊर्जास्त्रोत जसे की सौर, पवन, सागरीलाटा, जैविक, भूऔष्णिक इ. वापरणे. फक्त थरच्या वाळवंटातून सौर ऊर्जेद्वारा देशाची सध्याची विजेची गरज भागवता येईल. खंबायतच्या परिसरातील भरतीच्या लाटांच्या वैशिष्ट्यांमध्ये अशीच क्षमता आहे. कोकणातील भुगर्भातील ऊष्णतेद्वारे १०००० मे. वॅ. वीज मिळू शकते.
२.      ३९ टक्के ते ५२ टक्के असलेली वीजगळती थांबवणे. ऊर्जा कार्यक्षमता म्हणजे ऊर्जाबचत करणे. वीज कमी वापरणे. वाहनात फुकट जाणारी वीज योग्य उपकरणांद्वारे वाचविणे. वीज वापर होतो त्याच जागी वीज उत्पादन करणे.
३.      वीजेची मागणी मुळातच कमी करणे – वीजशिवायची जीवनपध्दती उदा. भास्कर सावे, उंबरगाव, गुजरात यांची निसर्गशेती यात कृत्रीम बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तण, बुरशीनाशके, वीजपंप, ट्रॅक्टर इ. वापरली जात नाहीत. तरीही अशा शेतीवर उत्कृष्ट विक्रमी उत्पादन मिळते. सेंद्रिय-निसर्ग शेतीवर आधारित स्वयंपर्ण गावांच्या निर्मितीने वीजेच्या वापराचे प्रमुख कारण असलेल्या औद्योगिकरण व शहरीकरणाची गरज उरत नाही. वीजेची नैसर्गिक संसाधनाची उधळपट्टी व नाश करणारी जीवनशैली टाळणे. अशी जीवनशैली ठेवणारी लोकसंख्यावाढ रोखणे.

सध्या आदर्श आणि लवासासाठी वीज तयार होते. ज्यांच्या आधीच ब-याच मालमत्ता आहेत, अशा खाबुगिरी करणा-या वरिष्ठ नोकरशहा, राजकारणी आणि धनदांडग्यांसाठी हे होत आहे. सामान्य माणसाने हे लक्षात घेतले पाहिजे की, तो निमित्त म्हणून वापरला जात आहे. मुंबईतील एका एका मॉल-टॉवर्समध्ये देशातील काही पंचक्रोशींची वा तालुक्यांची वीज जाळली जाते. औष्णिक वीजनिर्मितीसाठी वापरली गेलेली डहाणूची खाडी आणि नाशिकमधील एकलहरासारख्या देशातील ३०० प्रदेशांचे फक्त १-२ दशकात वाळवंटात रूपांतर होत आहे. तेथील लोकांची गरज अत्यंत कमी असूनही त्यांना मात्र ही वीज दिली जात नाही.

पर्यायी ऊर्जास्त्रोत

सूर्यप्रकाश, वारा, पाऊस, भरत्या, वाहते पाणी, भूगर्भातील उष्णता हे ऊर्जीप्रकार निसर्गाकडून सतत अत्यंत कमी वेळात भरून काढले जातात. यांना नवे, नुतनीकरणक्षम किंवा अपारंपारिक ऊर्जास्त्रोत म्हटले जाते. प्रचंड धरणांनी उपलब्ध होणा-या ऊर्जेची मात्र पारंपारिक ऊर्जेत गणना होते.

जरी भविष्यातील ऊर्जेच्या गरजेबाबतचे सरकारचे अंदाज मानले, तरी महागड्या,  प्रदुषणकारी, धोकादायक आणि मृत्यूदुत असलेल्या अणूशक्तीची वाट चोखाळण्याची कोणतीही गरज नाही. ऊर्जेची पूर्ण गरज इतर ऊर्जाप्रकारांकडून भागवली जाऊ शकते, ती देखील पर्यावरणाचा मोठी नाश टाळून. आजच सर्व अणूऊर्जा प्रकल्प बंद केले तरी नूतनीकरणक्षम अकार्बनी ऊर्जास्त्रोत भविष्यातील आपल्या सर्व गरजा भागविण्यास  चांगलेच समर्थ आहेत. हे केवळ भारताबाबत, नाही तर जगाबाबतही खरे आहे. उदा. अमेरिकेच्या विजेच्या गरजेच्या तिप्पट वीजपुरवठा करण्यासाठी फक्त रॉकी पर्वत आणि मिसिसीपी नदी यामधील वा-याचा प्रवाह पुरेसा आहे. जगातील ८००० स्थानांवरील वा-यांच्या अभ्यासात आढळले की, जगातील पवन ऊर्जेची क्षमता ७२ टेरावॅट म्हणजे २००० सालात पूर्ण जगाने वापरलेल्या वीजेच्या ४० पट एवढी आहे.

क्रमश:

1 comment:

Boneless Research said...

Very useful article with comprehensive analysis

Boneless Research