Monday 25 April, 2011

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम (भाग ५)

जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रमया लेखमालिकेतील मागिल भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा व आता पुढे...

चालू अणुभट्टी हीच एक सततची दुर्घटना

दुर्घटना कायमची – कारण अणुभट्टी शांतपणे सुरु आहे असे वाटले तरी सतत किरणोत्साराचे उत्सर्जन व प्रसारण होत राहते. भट्टीपासून ३५ किमीच्या परिघात तर हा प्रभाव तीव्र असतो. भट्टीतील किरणोत्सारी वायु व द्रव्ये वातावरणात अधुन मधुन सोडली जातात त्यांना व्हेंट म्हणतात. भट्टीतील किरणोत्सारी गंज तसेच किरणोत्सारी पाणी नजिकच्या नदी, तळे वा सागरात वरचेवर सोडली जातात, त्यास क्रुड म्हणतात. वातावरण व जमिन तसेच जलसाठे किरणोत्साराने प्रदुषीत होत राहतात. पृथ्वीवर पूर्वी कधीही अस्तित्वात नसलेली शेकडो भयानक स्वरूपाची किरणोत्सारी अणुकेंद्रके व द्रव्ये भट्टीत निर्माण होतात व पृथ्वीच्या पर्यावरणात शिरतात यांची किरणोत्साराची प्रक्रिया काही तासांपासून ते शेकडो, हजारो, लाखो किंवा कोट्यावधी वर्षे चालू राहते. मानवासह सर्व सजीवांना हा अनंत काळासाठी असणारा धोका, अणुभट्टीच्या चाळीस ते साठ वर्षाच्या वीजनिर्मिताच्या अत्यल्प काळात निर्माण होतो.

किरणोत्सार हा जीवनाचा मुळ घटक असलेल्या पेशींवर आघात करतो. कॅन्सरचे विविध प्रकार, जन्मजात व्यंगे, इंद्रिये निकामी होणे, मतिमंदत्व, अर्भके बालकांमधील पुढील असंख्य पिढ्यांमधील दोष व व्यंग, मासिक पाळीविषयी समस्या, वंध्यत्व, अशक्तपणा अशा अनेक व्याधी होतात हे निर्विवाद सिध्द झालेले आहे. याशिवाय होणा-या असंख्य व्याधींबाबत अजुनही वैद्यक शास्त्रास पुरेशी कल्पना आलेली नाही.  

सुप्रसिध्द अणुवैद्यक तज्ञ डॉ. हेलन कॉल्डीकॉट आपल्या अणुचे खुळ या ग्रंथात म्हणतात, एक डॉक्टर म्हणून मला खात्रीने सांगावे लागते की अणुतंत्रज्ञानात पृथ्वीवरील जीवनाचे उच्चाटन करण्याची धमकी सामावली आहे. जर सध्याचाच कल चाली राहिला तर आपण श्वास घेतो ती हवा, खातो ते अन्न आणि पितो ते पाणी लवकरच एवढ्या प्रमाणात किरणोत्सारी प्रदुषकांनी प्रदुषित होईल की त्यामुळे मानवजातीने कधीही न अनुभवलेला आरोग्याचा धोका निर्माण होईल.

महत्वाचे म्हणजे कर्मचारी आणि कामगारांना त्यांच्या शरिरात किती किरणोत्सार गेला आहे याचा अहवाल दिला जात नाही. कॅन्सरसारख्या आजारात प्रत्यक्ष प्रगट होण्याचा काळ दिर्घ असल्याने अणुउद्योग त्याची जबाबदारी टाळतो.

गळती झाल्यास होणारी किरणोत्सार हा नैसर्गिक किरणोत्सापेक्षा कमी असल्याचे ठोकून दिले जाते. मात्र डॉ. कॉल्डीकॉट व इतर वैज्ञक तज्ञ व शास्त्रज्ञांनी हे स्पष्ट केले आहे की, कोणताही मानवनिर्मित किरणोत्सार हा घातकच ठरतो. कारण ती नैसर्गिक किरणोत्सारात होणारी भर असते.

अनेकदा अणुउद्योगातील कामगार कर्मचा-यांना सांगितले जाते की, तुमच्या शरिरात गेलेल्या किरणोत्साराची मात्रा अत्यल्प आहे. परंतु अशी अत्यल्प मात्रा सातत्याने जात असल्याने त्याचा एकत्रीत होणारा परिणाम हा मोठ्या मात्रेएवढा असतो. शिवाय किरणोत्साराची कोणतीही किमान सुरक्षा मात्रा नसते. परंतु अज्ञानामुळे काम करणारी माणसे आपण सुरक्षित आहोत अशी भ्रामक कल्पना बाळगतात. जेव्हा कर्करोग किंवा इतर घातक व्याधी लक्षात येते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. अत्यंत तीव्र किरणोत्साराच्या जागी मुद्दामच हंगामी कामगार-कर्मचा-यांना नेमले जाते. त्यांना कामावरून काढले जाते. भावी आयुष्यात होणा-या प्राणघातक-दुर्धर व्याधींबाबतची जबाबदारी अर्थातच अणुउद्योग झटकून टाकतो.

किरणोत्सारी अणुकेंद्रकांमुळे फळे, मासे, पिके, दुध, मांस, जमीन, जलस्त्रोत इत्यादी प्रदुषित होतात. अशा अन्नाच्या सेवनामुळे मानवी शरीर प्रदुषित होते. म्हणूनच अणुभट्ट्यांच्या परिसरातील वातावरणात व जलस्त्रोतांत सोडले जाणारे किरणोत्सारी प्रदुषण स्थानिक तसेच विस्तृत परिसरातील अन्नस्त्रोतांना प्रदुषित करते. यामुळेच तेथील फळे, मासे, पिके, दुध, मांस इ. निर्यातदेखील शक्य होत नाही. कोकणात आंबे, काजू व इतर फळे, पिके, मांस, मासे यावर याचा विपरीत परिणाम होणार आहे. येथे अणुप्रकल्प आल्यास परदेशांतील जागृत झालेला ग्राहक येथील उत्पादनांस नकार देणार आहे.

चेर्नोबिल, थ्रीमाइल्स आयलंड, चेल्याबिन्स्क, विंडस्केल, हॅनफोर्ड स्वरुपाची भावी दुर्घटना

चेर्नोबिल अणुभट्टीचा स्फोट २६ एप्रिल १९८६ रोजी झाला. या दुर्घटनेत निर्माण झालेल्या किरणोत्साराचा वर्षाव युरोपातील २० देशांत प्रामुख्याने झाला. युनोच्या अहवालाप्रमाणे हा वर्षाव हजारो किलोमीटर अंतर कापून अटलांटीक महासागर ओलांडून कॅनडा या देशात व पुढे प्रशांत महासागराच्या पलिकडे पार जपानपर्यंत पोचला. दुर्घटनेपासून काही वर्षात लाखो माणसे किरणोत्साचे बळी गेली. या दुर्घटनेच्या वीसाव्या स्मृतीदिनाच्या प्रसंगी २००६ सालातील भाषणात युनोचे सरचिटणीस कोफी अन्नान यांनी म्हटले की, आजही सुमारे सत्तर लाख माणसे किरणोत्साराने बाधित आहेत. त्यापैकी तीस लाख बालके आहेत आणि अशी शक्यता आहे की, ती बालके प्रोढावस्था गाठण्याआधीच मृत्यूमुखी पडतील. चेर्नोबिल होऊन खुप काळ लोटला. आता तेच तेच काय सांगता असे म्हणणा-यांना इतर आजार आणि किरणोत्साराचे आजार व इतर अपघात आणि अणुभट्टीचा अपघात यातील फरक समजलेला नाही. किरणोत्सार पुढील अगणित पिढ्यांमध्ये अस्तित्व दाखवत राहतो. कारण तो पुनरुत्पादनाच्या पेशी व जनुक गुणसुत्रांवर आघात करतो, बदल घडवतो.

चेर्नोबिल अणुभट्टीपासुन ३० किमी त्रिज्येच्या वर्तुळातील माणसांना कायमचे इतरत्र हलविले गेलेले आहे. पिप्रियाट हे चेर्नोबिल येथील कर्मचा-यांच्या निवासाचे शहर याच क्षेत्रात येते. हे ५०००० लोकवस्तीचे शहर आता कायमचे निर्मनुष्य झाले आहे. मोटार आणि विमान अपघात होत नाहीत काय? असे म्हणणा-या अज्ञानी अणुसमर्थकांनी अणुअपघात आणि इतर अपघातातील फरक लक्षात घ्यावा. अशीच परिस्थिती रशियातील किश्तिम या शहराजवळच्या भूभागात आहे. चेल्याबिंन्स्क येथील दुर्घटनेनंतर येथील शेकडो किमीचा प्रदेश एखाद्या जीवन नसलेल्या परग्रहाप्रमाणे भयाण, वैराण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जैतापूरचा प्रकल्प मुंबईसह महाराष्ट्र भारतावरील संकट ठरणार आहे.

पृथ्वावरील जीवनाची निर्मिती आणि त्यातील बहुविविधता हा खरा विकास होता. ती खरी प्रगती होती. हायड्रोजन या प्रथम क्रमांकाच्या मुलद्रव्यापासून पुढे ९२ मुलद्रव्यांची निर्मिती, त्याला मिळालेली चैतन्याची जोड व त्यातून अवतरलेले सजीव असा हा जीवन फुलवणारा प्रवास होता. मात्र विज्ञानाच्या अपु-या आकलनाने आणि तंत्रज्ञानाला विज्ञान मानण्याच्या चुकीमुळे पुन्हा उलट प्रवास सुरु झाला. जीवन संपुष्टात आणणा-या भंजनाकडे आणि किरणोत्सार्गाकडे होणारा प्रवास ही अधोगती व विनाश आहे. निसर्गाने अणु जोडले होते मानवाने उन्मादात, अज्ञानापोटी ते तोडले. पदार्थाच्या, द्रव्याच्या सर्वात छोट्या कणाला म्हणजेच अणुला तोडण्याच्या मानवाच्या प्रमादामुळे निर्माण झालेल्या किरणोत्साराने सजीवांच्या घडणीचा, बैठकीचा मुलभूत आधार असलेल्या पेशीचे, त्याचा भावी आराखडा असेलेल्या जनूकाचे भंजन केले. भंजनाच्या अनियंत्रीत शक्तीद्वारे प्राप्त झालेल्या अणुबॉंम्बच्या संहारक उपलब्धीमुळे माणूस बेहोश झाला. पण या नादात त्याने किरणोत्साराला म्हणजेच पर्यायाने पेशींच्या अनियंत्रीत भंजनाला व वाढीला, एका संहारक प्रक्रियेला, कर्करोगाला व इतर व्याधींना मोकाट सोडले. अणुऊर्जेच्या राक्षसाला पुन्हा बाटलीत बंद केल्यानेच जीवन वाचवता येईल.

अनंत पसरलेल्या पृथ्वीवरील जीवन अतुलनीय आहे. त्याच्यासमोर चलन, पैसा किंवा तंत्रज्ञान या क्षुद्र गोष्टी आहेत. हे जीवन जपण्याची मोठी जबाबदारी मेंदूचा विकास झालेल्या मानवावर आहे. कारण निसर्गानेच दिलेल्या मेंदूच्या क्षमतेचा गैरवापर तो करत आहे.

चेर्नोबिलसारखी प्रचंड किरणोत्साराची दुर्घटना, एखादा दहशतवादी हल्ला किंवा गुन्हेगारी मानसिकता असलेल्या गटाच्या अथवा देशाच्या हाती प्ल्युटोनियम पडणे अशा शक्यतांची टांगती तलवार अणुकार्यक्रमाच्या प्रसारामुळे मानवजातीच्या डोक्यावर राहणार आहे. अणुभट्ट्यांमधून अणुबॉंम्ब निर्मितीसाठी आवश्यक अशा प्लुटोनियमची मोठी निर्मिती होत असते. एका एक हजार मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीला वर्षाला तीस ते पन्नास अणुबाँम्बसाठी पुरेसे ठरेल एवढे प्लुटोनियम (सुमारे ३०० ते ५०० किलो) तयार होते. अण्वस्त्रप्रसाराला आळा घालणे त्यामुळे अशक्य बनते. आज पृथ्वीवरील जीवनाला शेकडो वेळा नष्ट करू शकतील इतके अण्वस्त्राचे साठे करून ठेवले आहेत. वीजनिर्मितीच्या नावाने साळसुदपणे चालणा-या अणुभट्टयांचे हे छुपे भयावह रुप आहे. अनेक देशांना त्याचेच आकर्षण आहे.

क्रमश:

No comments: