आज २६ एप्रिल चेर्नोबिल अणुस्फोट दुर्घटनेला २५ वर्षे झाली. याच स्फोटात लाखो निरपराधांना आपले प्राण गमवावे लागले, इतकेच नव्हे तर आजही जन्माला येणारे सजीव व्यंग घेऊनच जन्माला येत आहेत. जपानच्या फुकुशिमामध्ये घडलेली दुर्घटना आपण पाहिलीच आहे. या दोन्ही घटना जैतापूरच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडत आहेत. सर्वसामान्यांना फक्त अणुऊर्जा देशाची गरज असल्याचे दाखवून जनतेचा पाठिंबा मिळवू पाहणारे सरकार याच्या दुष्परिणामांबद्दल का बोलत नाही? कोकणाकडे कधीही चांगल्या गोष्टींसाठी दुर्लक्ष करणारे सरकार यावेळेस मात्र मेहरबान झाल्याचे आव का आणत आहे, यातील दुष्परिणाम पाहता कोकण संपविण्याचा तर प्रयत्न यांचा नाही ना? अशा शंका घ्यायला वाव आहे.
‘जैतापूरचे सत्य आणि अणूऊर्जेचा महाभ्रम’ या लेखमालिकेतील आजचा हा शेवटचा भाग. मागिल भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा व आता पुढे...
इतिहासाचा विकृत वारसा
दुस-या महायुध्दाच्या पार्श्वभूमीवर अणुबाँम्ब निर्मितीने वेग घेतला. याच काळात वैज्ञानिक इतिहासात प्रथमच वैज्ञानिकांचा, विशेषत: पदार्थविज्ञानाचा अणुशास्त्रज्ञांचा गुप्ततेशी संबंध आला. १९४० पासून लष्कराशी संबंध आल्यावर हा गुप्ततेचा पडदा अधिक गडद झाला. मुळातच हा लष्कराचा संबंध अनिष्ट होता. त्यातून आली सर्वंकष गुप्तता. जनतेच्या जीवनाशी, आरोग्याशी खेळ सुरू झाला. असा खेळ करण्याचा अधिकार यांना कुणी दिला?
त्या काळात हिटलरच्या आधी बाँम्ब बनविण्याच्या उद्दिष्टाने अनेक शास्त्रज्ञ भारावले होते. परंतु हिटलरच्या पराभवानंतर या उद्दिष्टाचे रूपांतर जेव्हा युध्द संपविण्याच्या आत बाँम्ब बनविण्यात आले तेव्हा आपली चुक शास्त्रज्ञांच्या लक्षात आली. पण तोवर वेळ निघून गेली होती. आता राजकारणी, लष्करी अधिकारी आणि अभियंत्यांना त्याचा कसेही करून वापर हवा होता. आणि लक्ष्य ठरला जपान, त्यातही त्यांचा नागरी विभाग. अमेरिकेचा पूर्वेकडील युध्द आघाडीचा उमदा सेनापती डग्लस मॅकार्थर हा खुद्द अण्वस्त्राच्या वापराच्या विरोधात होता. त्याने तीन महिन्यात जपानला शरण आणून युध्द समाप्ती करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अणुबाँम्ब बनविणा-या शास्त्रज्ञांसह सर्वांकडे दुर्लक्ष करून हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबाँम्बचा वापर केला गेला. मानवाच्या सर्वंकष दहशतीच्या आणि संहाराच्या सत्रात प्रवेश झाला. याच इतिहासाचा विकृत वारसा अणुक्षेत्रातील उच्चपदस्थ चालवितात.
हिरोशिमा, नागासाकीतील अणुबाँम्बच्या किरणोत्साराचे दुष्परिणाम पुढच्या पिढ्याही भोगत आहेत. यातच अणुऊर्जेची भीषणता आहे. अणु बाँम्बच्या वापरानंतर जगभरात अणुविरोधी लाच उसळली. परंतु तोपर्यंत या पाशवी शक्तीची राजकारणी आणि लष्करशहांना चटक लागली होती.
अणुभट्टयांतून प्लुटोनियनम या अधिक संहारक बाँम्बना जन्म देऊ शकणा-या समस्थानिकाची निर्मिती होत होती. म्हणून क्लुप्ती काढली गेली. ‘शांततेसाठी अणु’ अशी नवी घोषणा जिनेव्हा येथील परिषदेत १९५५ साली दिली गेली. वीजेची निर्मिती हे केवळ निमित्त होते. कारण त्यामुळे भट्ट्या चालवता येणार होत्या. ती नगण्य असणार याची अणु प्रवर्तकांना पूर्ण जाणिव होती. दुर्दैवाने जगभरातील जनतेला आजही याची जाणीव नाही. आणि तथाकथित वीजनिर्मितीच्या विधायक वापराचा मुखवटा घालून अण्वस्त्रप्रसार मात्र जोरात चालू राहिला.
जैतापूर प्रकल्प आणि अणुकार्यक्रम हा देशासाठी कर्जाचा साफळा
मुळातच अणुऊर्जा अयोग्य आहे आणि जैतापूर प्रकल्प अनिष्ट आहे. त्यामुळे कोणती कंपनी हा प्रकल्प करणार हा प्रश्नच गैरलागु आहे. तरीही जनतेपर्यंत काही माहीती पोहचणे गरजेचे वाटते.
फ्रान्सची अरेवा ही सरकारी कंपनी हा प्रकल्प करू इच्छिते. या कंपनीची युरेनियम प्रेशराईज्ड रिएक्टर ही अणुभट्टी बांधण्याचा फिनलंड देशातील प्रयत्न त्या देशाला चांगलाच तापदायक ठरला आहे. त्या देशाच्या मंत्र्यांनी याबाबत पश्चात्ताप व्यक्त केला आहे. तेथील नुतनीकरणक्षम, प्रदुषणरहित ऊर्जास्त्रोतांसाठी ठेवलेला पैसा या अणुभट्टीमुळे खर्च झाला. विलंब वाढत गेला व खर्च अनेकपट झाला आहे. देश त्यात पोळून निघाला. फ्रान्सला फ्लॅमव्हिले भट्टीबाबत असाच अनुभव आला.
अरेवाच्या भट्टीत सुमारे २१०० दोष संबंधित यंत्रणेने दाखविले, ज्याचे स्वरूप धोकादायक आहे. फ्रान्सने अणुऊर्जादेखील कार्बन ऊत्सर्जन करते हे लपविले आहे. तरीही फ्रान्स देश क्योटो शिष्टाचाराने घालून दिलेले कार्बन ऊत्सर्जन कमी करण्याचे उद्दीष्ट पार पाडू शकला नाही. फ्रान्स वीज उत्पादनापैकी ७८ टक्के उत्पादन अणुऊर्जेद्वारे करते याचा वारंवार उल्लेख केला जातो. परंतु त्याच्या एकूण ऊर्जाउत्पादनात अणुवीजेचे प्रमाण फक्त १७ टक्के आहे हे सांगितले जात नाही. खर्चिक अणुऊर्जा कार्यक्रम हे फ्रान्सच्या गळ्यातील लोढणे ठरले आहे. युरोप व अमेरिकेत अणुऊर्जेविरोधात जनमत असल्याने हा उद्योग धोक्यात आला आहे म्हणून त्यांच्या कंपन्या चालू ठेवण्यासाठी भारताला बळीचा बकरा बनविला जात आहे. चेर्नोबिलपासून युरोपने, तर थ्रीमाईल्स दुर्घटनेपासून म्हणजे १९७९ पासून अमेरिकेने नव्या अणुभट्टी बांधणीचा कार्यक्रम हाती घेतला नाही.
सध्याच्या जैतापूरच्या फक्त सहा अणुभट्ट्यांसाठी देशाला एकूण एक लाख ऐंशी हजार कोटी रूपये मोजावे लागणार आहेत. इतर खर्च वेगळा होईल. हा पैसा कर्जरूपाने उभारला जाईल व अनायसे हा देश जागतिक बँकेच्या म्हणजे पर्यायाने अमेरिकेच्या दावणीला बांधला जाईल. त्यानंतर हे कर्ज फेडले जाणार नसल्याने अमेरिका व इतर पाश्चात्य देश भारताच्या नैसर्गिक संसाधनावर ताबा मिळविणार आणि अनेक धोरणे व निर्णय त्यांना हवे तसे घेण्यास भारताला भाग पाडणार. खरेतर हे सध्याच चालू आहे. संभाव्य भ्रष्ट्राचार हा मुद्दा आहेच. नुकतेच स्वीस बँकेच्या संचालकाने सांगितल्याचे प्रसिध्द झाले आहे की, काही भारतीयांचा २०० लाख कोटी रूपये एवढा पैसा स्वीस बँकेत जमा आहे. हा पैसा विकासकामांच्या पांघरुणाखालीच जमा झाला हे जनतेने लक्षात घ्यायला हवे. आर्थिक मारेक-याचा कबुलीजबाब (confessions of a economic hit man) या ग्रंथात लेखकाने प्रकल्प लादण्याची पध्दती उघड केली आहे.
चेर्नोबिलच्या नुकसानभरपाईची रक्कम तेव्हा सुमारे २५ लाख कोटी रूपये एवढी प्रचंड होती. भारतासारख्या दाट वस्तीच्या देशात काय घडेल त्याची कल्पना करावी. त्यामुळेत विमा कंपन्या अणुभट्ट्यांचा विमा उतरवीत नाहीत. कारण एखादा अपघात त्यांचे दिवाळे काढू शकतो. यातून भट्टी बांधणा-या कंपन्यांना वाचविण्यासाठी सरकारने संसदेत अलिकडे विधेयक संमत करून फक्त सुमारे दिड हजार कोटी रूपये ची मर्यादा घातली आहे. याचा अर्थ हा प्रचंड बोजा भारतीय जनतेवर पडणार शिवाय किरणोत्सारामुळे भावी पिढ्यांमध्ये होणा-या आजारांची जबाबदारी कोण घेणार?
एका एक हजार मेगावॅट क्षमतेच्या अणुभट्टीत हिरोशिमासारख्या एक हजार अणुबाँम्बचा किरणोत्सार सामावलेला असतो. अणुभट्टी स्विकारणे म्हणजे कोकणवासियांनी रोज उशाशी हजारो अणुबाँम्ब घेऊन झोपण्यासारखे आहे. यातून यातील गांभिर्य लक्षात येईल. पंचवीस वर्षांपूर्वी घडलेल्या भोपाळ दुर्घटनेबाबतचा आपल्या सरकारचा लज्जास्पद अनुभव पाहता अणुअपघातामुळे काय हाहाकार होईल याची कल्पना करावी.
डॉ. गॉफमन यांनी उद्गार काढले आहेत की, अणुतंत्रज्ञानाला मानवी चेहरा नाही.
जैतापूरचे सत्य आणि अणुचा हा महाभ्रम ओळखून आपल्या भावी पिढ्यांच्या आणि जीवसृष्टीच्या निरोगी अस्तित्वासाठी निसर्गसमृध्द कोकणाच्या निकोप पर्यावरणासाठी कार्यरत होऊ. जैतापूर प्रकल्प रद्द करवून घेऊया आणि अणुचा महाभ्रम झुगारून देऊ या.
एक मुखाने गर्जा, नको अणऊर्जा
धन्यवाद,
आपला
गिरीश राऊत
फोन २४३७८९४८
दूरध्वनी ९८६९०२३१२७
फोन २४३७८९४८
दूरध्वनी ९८६९०२३१२७
समाप्त