Sunday, 15 May 2011

निवडणूका संपल्या की हमखास भाववाढ ठरलेली असते..


महागाईने सध्या सर्वोच्च उसळी घेतलेली आहे. देशात कुठल्याही प्रांतात निवडणूका झाल्या की हमखास भाववाढ होत असते. परवाच पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पॉंडेचरी आदी पाच राज्याचे निकाल हाती आले. निकाल लागून २४ तास उलटतात तोच पेट्रोल रु. ५ प्रती लीटर भाववाढीची बातमी देशाला ऐकायला मिळाली आणि सर्वत्र सरकारविरोधात चीड व्यक्त केली जात आहे.

पेट्रोल भाववाढीचा फटका फक्त गाडी असलेल्या जनतेलाच बसत नसतो. इंधन भाववाढीचा थेट संबंध हा प्रत्येक जीवनावश्यक वस्तुंच्या वाहतुकीवर होत असल्याने सर्वसामान्यांपासून सर्वांनाच याचा फटका बसत असतो. सरकारचे यावर ठरलेले उत्तर असते, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती वाढल्याने भाववाढीशिवाय पर्याय नाही, परंतु हेच सरकार जेव्हा निवडणूका सुरु असतात तेव्हा कुठल्याही प्रकारची भाववाढ न करता देश कसा चालवतात, हे त्यांनाच माहीत.

काल रात्रीपासून भाववाढ झाल्याने आता उद्या सोमवारपासून सर्वसामान्य जनतेला याची खरी झळ पोचायला सुरुवात होणार आहे. देशात कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी ही भाववाढ रोखू शकत नाही हे मान्य. पण घोटाळे आणि मंत्र्यांची चैन तसेच अवाजवी दिले गेलेले भत्ते यामुळेही भाववाढीवर काही प्रमाणात अंकुश घालता येऊ शकते. देशातील सर्वच भ्रष्ट्राचारी पैसा खाऊन काही दिवस जेलमध्ये राहून मग आरामाचे जीवन आपापल्या पक्षात राहून जगतात, पण ज्या जनतेचा यात कसलाही दोष नसतो तीला मात्र आपले आयुष्य न वाढलेल्या उत्पन्नातच कंठत काढावे लागते.


मागच्या काही काळातील भाववाढीचे आकडे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.