Sunday, 29 May 2011

नक्की हे डिओडरन्ट विकतात ना?

मार्केटींगचे एक सूत्र आहे की, जाहिरात करताना आपल्या उत्पादनाची ओळख ही लोकांच्या मनात खोलवर रुजवली गेली पाहिजे. आपल्याकडे टूथपेस्टला अनेकजण कोलगेट म्हणतात, फोटोकॉपीला आपण झेरॉक्स म्हणतो, याच्यापेक्षा मोठे यश एखाद्या उत्पादनाचे असूच शकत नाही. पण आजकाल डिओडरन्ट विकणा-या कंपन्यांच्या जाहिराती बघून मुलींना मुलांकडे आकर्षित करण्याचे गुण असल्याचे जाहिरातींमधून दाखविले जाते. प्रत्यक्षात हे डिओडरन्ट शरिरातील घामामुळे निर्माण होणा-या दुर्गंधीला रोखण्यासाठी असतात, मग याचा मुलींना आकर्षित करण्याचा संबंध कुठे येतो? असा कोणी विचार केलाय?

काल एका ठिकाणी वाचले की आठ वर्षे ‘AXE’ या कंपनीचे डिओडरन्ट वापरून एकही मुलगी न पटल्याने एका तरुणाने त्या कंपनीला कोर्टात खेचले आहे तसेच २६००० पौंड एवढी नुकसान भरपाईसुध्दा त्या कंपनीकडून मागितली आहे.

आपले उत्पादन काय आहे आणि दाखविले काय जाते, याबाबतची चौकशी करणारी कुठली यंत्रणा सरकारकडे आहे का?  कारण या डिओडरन्ट कंपन्यांच्या जाहिराती कंडोमच्या जाहिरातींपेक्षाही भडक असतात. तसेच त्यात मुलींना वश करण्याची ताकद आहे असे खोटे दावे केले जातात. प्रत्यक्षात याच खोट्या दाव्यांमुळे तरूण अमुक एखाद्या कंपनीचे उत्पादन केवळ मुलींमध्ये आकर्षण वाढावे या खोट्या भ्रमापाई घेतात. पर्यायाने फसव्या स्किम्समध्ये जसा ग्राहक फसतो तसाच या अशा फसव्या जाहिरातींना भुलून अनेकजण यात आपला पैसा गमावून बसतात.

टिव्हीवर दाखविल्या जाणा-या सर्वच प्रकारच्या जाहिरातींमधील ९५%  दावे हे खोटेच असतात. मग ते शाम्पू असेल, साबण असेल किंवा आठ दिवसात गो-या करणा-या क्रिम असतील, यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने अतिशय मोठ्या प्रमाणात जनता यांच्या बकवास जाहिरातींना भुलून त्यांचे उत्पादन खरेदी करते. हे एक फसवेगिरीचे रॅकेट सर्वांसमक्ष सुरु आहे आणि जनता दिवसेंदिवस या रॅकेटमध्ये अडकली जातेय, म्हणून ग्राहक संरक्षण करणा-या संस्थांनीच पुढे येऊन यांच्यावर कारवाई कशाप्रकारे करता येईल यावर विचार करायला हवा.

आपल्याकडील विदेशी कंपन्यांनी स्वदेशी कंपन्यांवर कुरघोडी करण्यासाठी अनेक प्रकारचे खेळ सुरू केलेले आहेत. सौदर्य प्रसादने तसेच आयुर्वेदीक औषधे बनवून विकणा-या बाबा रामदेव यांच्या उत्पादनांवर सर्रास प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा होत असते. आयुर्वेदामुळे तसे दुष्परिणाम नसातात हे आपल्या सर्वांना माहिती आहे. बाबा रामदेव योगाच्या माध्यमातून अनेकांचे शरिरस्वास्थ ठिक करत आहेत असा अनेकांचा अनुभव असतो, पण तेच भाईंदरची एक घटना काय घडली चारही बाजूंनी बाबांना घेरण्याचा प्रयत्न मिडीयाकडून सुरू झाला. का?  कारण बाबांकडून याच चॅनेलवाल्यांना जाहिरातीचे पैसे मिळत नाहीत. बाबा रामदेव हे युपीए सरकारच्या भ्रष्ट्राचारावर जोरदार आवाज ऊठवत असल्याने हे कॉंग्रेसचे राजकारणही असू शकते. पण मग जर हा न्याय ‘पतंजली’च्या उत्पादनांना असेल तर या खोटे दावे करून बक्कल पैसा कमावणा-यांवरही कारवाई करण्यासाठी हे लोक का पुढे येत नाहीत?