Sunday 12 June, 2011

‘शिवशक्ती-भीमशक्ती’च्या निमित्ताने पन्नास वर्षे!


"महाराष्ट्रात राजकारणात जात न मानणारे एकमेव नेतृत्व म्हणून शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव घ्यावे लागेल. तिकीटवाटप करताना जातीचा विचार न करणारे तेच एकमेव आहेत. त्याशिवाय 1995 साली महाराष्ट्रात अधिकारावर आलेले शिवसेना-भाजपचे मंत्रिमंडळ खर्‍या अर्थाने प्रातिनिधिक मंत्रिमंडळ होते. महाराष्ट्राच्या पन्नास वर्षांत एवढ्या सर्व जातींना समावेश करून घेणारे मंत्रिमंडळ झालेले नाही." जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी शिवशक्ती-भीमशक्ती युतीवर होणाऱ्या टिकेचा समाचार आजच्या उत्सव पुरवणीतून घेतला तो लेख जसाच्या तसा आपल्यासाठी माझ्या ब्लॉगवर चिकटवत आहे.


शिवशक्ती-भीमशक्तीएकत्र येण्याच्या राजकीय वातावरणावर महाराष्ट्राच्या काही वृत्तपत्रांनी उलटसुलट बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत. काही जाणीवपूर्वक आहेत तर काही प्रचारी आहेत. युती म्हणा बडी आघाडी म्हणा किंवा जनता पक्ष म्हणा-किंवा पु.लो.द.म्हणा). या प्रत्येक राजकीय स्थित्यंतरात समविचारी पक्षकिंवा सेक्युलर पक्षयांची आघाडी हे शब्द कधीच निकालात निघाले आहेत. त्यामुळे आता शिवसेना आणि रिपब्लिकन पक्षाचा आठवले गट राजकीयदृष्ट्या जवळ येत आहे. त्यांचा गदारोळ करीत असताना पन्नास वर्षांपूर्वीचे राजकारण तपासले तर अशा अनेक आघाड्या देशात यापूर्वी झालेल्या आहेत.

डॉ. राममनोहर लोहिया यांनी गैरकॉंग्रेस वादया शब्दाचा उपयोग करून देशात कॉंग्रेसविरोधात सर्व पक्षांनी एकत्र येण्याचा जो प्रयोग सुरू केला तेव्हापासूनच समविचारी पक्ष किंवा सेक्युलर पक्ष एकत्र येऊ शकतात ही संकल्पना पन्नास वर्षांपूर्वीच बाद झाली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हयातीत म्हणजे 1963 साली देशात लोकसभेच्या चार पोटनिवडणुका झाल्या होत्या. या चारही पोटनिवडणुकांमध्ये विरोधी पक्षाच्या चार उमेदवारांना देशातल्या त्या वेळच्या सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देऊन पहिली राजकीय आघाडी तेव्हाच केली होती. खुद्द राममनोहर लोहिया हे समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून कनोज मतदारसंघातून उभे होते, राजकोटमधून स्वतंत्र पक्षाचे मिनू मसानी उभे होते, अमरोहमधून आचार्य कृपलानी उभे होते आणि मुंघेर (बिहार) मधून समाजवादी पक्षाचे मधू लिमये उभे होते. या चार विविध पक्षांच्या उमेदवारांना त्यावेळच्या सर्व विरोधी पक्षांनी-ज्यात जनसंघही होता-पूर्ण पाठिंबा दिला होता आणि हे चारही उमेदवार विजयी झाले होते.

1967 साली देशात नऊ राज्यांत कॉंग्रेसविरोधातील सरकारे पहिल्याप्रथम अधिकारावर आली. (1957 चा केरळचा अपवाद) या नऊ राज्यांपैकी पंजाबमध्ये अकाली दलाचे प्रकाशसिंग बादल या नेत्याच्या मंत्रिमंडळात त्यावेळी कम्युनिस्ट आणि जनसंघ अशा परस्परविरोधी दोन्ही पक्षांचे प्रतिनिधी सामील झाले होते. जनसंघाचे त्यावेळचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी त्या सुमारास मुंबईत आले असताना झालेल्या पत्रकार परिषदेत मीच वाजपेयींना प्रश्‍न विचारला होता की, ‘पंजाब में अकाली दल और कम्युनिस्टों के साथ जनसंघ मंत्रिपरिषद में कैसे सामील हो गया?’ वाजपेयींनीं उत्तर दिले होते, ‘कॉंग्रेस के खिलाफ एक राजकीय प्रयोग कर रहे हैं।त्यावेळी समाजवादी पक्षाचे जॉर्ज फर्नांडिस यांनी वाजपेयींवर तीक्र टीका केली होती. पंधरा दिवसांनंतर मध्य प्रदेशात गोविंदनारायण सिंग यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात समाजवादी पक्षाचे अरीफ बेग यांनी मंत्री म्हणून शपथ घ्यावी असा प्रस्ताव समाजवादी पक्षाने मंजूर केला. त्यावेळी समाजवादी पक्षाचा संयुक्त समाजवादी पक्षझाला होता.
1967 सालीच दक्षिण मुंबईत कॉंग्रेसचे उमेदवार स. का. पाटील यांच्याविरुद्ध जॉर्ज फर्नांडिस हे संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून वडाचे झाडनिशाणी घेऊन उभे होते. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस हे जनसंघाचे कट्टर विरोधक मानले जात होते. त्याच सुमारास देशात साधूंनी गाय बचावआंदोलन केले होते. त्यावेळच्या जनसंघाची देश धरम का नाता है, गाय हमारी माता हैअशी घोषणा होती. चौपाटीवर या गाय बचावआंदोलनाची साधू मंडळींची एक मोठी सभा जनसंघाने आयोजित केली होती. दक्षिण मुंबई विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात गुजराती मतदार असल्यामुळे आणि या सभेला मोठ्या प्रमाणात गुजराती मतदार राहण्याची शक्यता असल्याने जॉर्ज फर्नांडिस यांनी सभेत जाऊन भाषण करावे असे त्यांना सुचविण्यात आले आणि मतांच्या सोयीच्या राजकारणात त्यांनी ते मान्य केले. साधूंसमोर जाऊन त्यांनी भाषण केले. त्या भाषणात फर्नांडिस यांच्या ओबडधोबड हिंदीत गाय हमारी माता हैअसे जॉर्ज फर्नांडिस यांनी जोरात सांगितले होते. ती सभा आटपून रात्री अकरा वाजता (त्यावेळी रात्री दहापर्यंत सभा संपवावी हा नियम नव्हता.) मस्तान तलाव येथे जॉर्ज फर्नांडिस यांच्या प्रचाराची सभा त्या मतदारसंघातले विधानसभेचे उमेदवार जी. एम. बनातवाला यांनी आयोजित केली होती. साधूंच्या सभेत भाषण करून जॉर्ज फर्नांडिस रात्री अकरा वाजता मस्तान तलावावर आले. त्यांच्यासोबत मराठाचा प्रतिनिधी म्हणून मीही होतो. त्या सभेत भाषण करताना जॉर्ज फर्नांडिस यांनी ये जनसंघी सुअर के बच्चेअशा शब्दांत जनसंघावर हल्ला केला होता.

पुढे हे जॉर्ज फर्नांडिस चक्क नामांतर झालेल्या भाजपच्या मांडीवर कधी जाऊन बसले आणि मंत्री कधी झाले याचा पत्ताच लागला नाही. समाजवादी मित्र तोंडात बोट घालून जॉर्ज फर्नांडिस यांच्या या राजकीय परिवर्तनाबद्दलगप्प बसले होते.

1971 साली इंदिरा गांधी यांनी लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका जाहीर केल्या. या निवडणुकांमध्ये इंदिरा गांधी आणि कॉंग्रेस पक्ष यांना पराभूत करण्याकरिता देशात सर्व राजकीय पक्षांनी परस्पर छेद असताना बडी आघाडीस्थापन केली. या बड्या आघाडीत जनसंघ होता, गायत्रीदेवींचा स्वतंत्र पक्ष होता, एस. एम. जोशी यांचा संसोपाहोता, दोन्ही कम्युनिस्ट पक्ष होते. या बड्या आघाडीचा निवडणुकीत बेंडबाजा वाजला.
1977 साली आणीबाणीविरोधात देशातले सगळे विरोधी पक्ष कॉंग्रेसविरुद्ध एक होऊन जनता पक्षस्थापन झाला. या जनता पक्षात बडी आघाडीमधील सर्व राजकीय पक्ष होते. तेव्हाही जनसंघ होताच, समाजवादी कम्युनिस्टही एक होते. त्या त्या वेळच्या राजकीय गरजेनुसार देशात या आघाड्या बनत गेल्या आणि कोसळत गेल्या.
1978 साली महाराष्ट्रात शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांचे कॉंग्रेस-कॉंग्रेस (एस) हे सरकार पाडले आणि पुरोगामी लोकशाही आघडी या पाटीखाली (पुलोद) स्थापन करून शरद पवार मुख्यमंत्री झाले. त्यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे उत्तमराव पाटील (महसूलमंत्री) आणि हशू अडवाणी (नगरविकास मंत्री) असे दोन मंत्री सामील झाले होते. त्यांच्यासोबत शे. का. पक्षाचे एन. डी. पाटील (सहकार मंत्री) आणि गणपतराव देशमुख (रोजगार हमी मंत्री) हेही सामील होते. शिवाय समाजवादी पक्षाचे भाई वैद्य हे गृहराज्यमंत्री होते.

गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रात असे उलटसुलट तोंडाचे अनेक पक्ष सोयीनुसार, गरजेनुसार, निवडणुकीच्या वेळापत्रकानुसार एकत्र येण्याची भूमिका अनेक वेळा घेतली आहे. ती घेतली जात असताना राजकीय सिद्धांत, सेक्युलर पक्ष, समविचारी पक्ष ही विशेषणे कधीही विचारात घेतली नाहीत. चार वर्षांपूर्वी कॉंग्रेसनेसुद्धा गोंदिया जिल्हा परिषदेत सत्ता मिळविण्याकरिता भाजपसोबत आघाडी केली, तर भंडारा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने भाजपसोबत आघाडी करून फिट्टमफिट केली.

राजकारणात अशा अनेक आघाड्या यापूर्वी झालेल्या आहेत. शिवसेना आणि आठवले गट एकत्र येत असताना काहीतरी विपरीत घडले असे समजण्याचे कारण नाही. जनसंघावर हयातभर टीका करणारे महाराष्ट्राचे आक्रमक विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप नंतर भाजपमध्ये सामील झाले. विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून शिवसेनेवर तुटून पडणारे दि. बा. पाटील शिवसेनेत दाखल झाले. शरद पवार यांच्या भूखंडाचे श्रीखंडविधानसभेत सर्वांच्या ताटात वाढणारे छगन भुजबळ हे पवार यांच्या पक्षात गेले आणि सोनिया गांधी यांना परदेशी मूलमुद्यावर विरोध करून वेगळा पक्ष काढणारे शरद पवार हे सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या यूपीए सरकारमध्ये सामील झाले आहेत.

राजकारणात पक्ष किंवा व्यक्ती यांची मते बदलत असताना, आघाडीत बिघाडी होत असताना तुम्ही पूर्वी काय म्हटले होतेहे दाखले तद्दन निरर्थक आहेत. गेल्या पन्नास वर्षांत महाराष्ट्रातल्या बहुसंख्य वृत्तपत्रांनीसुद्धा आपल्या राजकीय भूमिका सोयीनुसार बदलल्या आहेत. आपले राजकीय पुढारीही सोयीनुसार बदलले आहेत आणि पेड न्यूजघेऊन बातम्या छापणार्‍या वृत्तपत्रांना दुसरे कोणते राजकीय पक्ष चुकले हे सांगण्याचा किती अधिकार शिल्लक राहिला आहे?

मी शिवसेनेचा समर्थक नाही. आवश्यक तेव्हा टीकाही केली आहे. परंतु महाराष्ट्रात राजकारणात जात न मानणारे एकमेव नेतृत्व म्हणून शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव घ्यावे लागेल. तिकीटवाटप करताना जातीचा विचार न करणारे तेच एकमेव आहेत. त्याशिवाय 1995 साली महाराष्ट्रात अधिकारावर आलेले शिवसेना-भाजपचे मंत्रिमंडळ खर्‍या अर्थाने प्रातिनिधिक मंत्रिमंडळ होते. महाराष्ट्राच्या पन्नास वर्षांत एवढ्या सर्व जातींना समावेश करून घेणारे मंत्रिमंडळ झालेले नाही. मनोहर जोशी (ब्राह्मण), गोपीनाथ मुंडे (वंजारा), लीलाधर डाके (आगरी), अण्णा डांगे (धनगर), चंद्रकांत खैरे (बुरूड), बबनराव घोलप (दलित), प्रमोद नवलकर (पाठारे-प्रभू), सााबीर शेख (मुस्लिम), जयप्रकाश मुंदडा (मारवाडी) अशा महाराष्ट्रातल्या खर्‍या अर्थाने अठरापगड जातींना प्रतिनिधित्व मिळाल्याचा आनंद तेव्हा तमाम वृत्तपत्रांनी व्यक्त केला होता.

शिवसेना आणि रामदास आठवले एकत्र येत असताना पन्नास वर्षांतला हा तपशील मुद्दाम स्पष्ट केला आहे. सेनावाले आठवले यांच्यासोबत किती राहतील किंवा आठवले त्यांच्यासोबत किती राहतील हे सांगणेही अवघड आहे. आठवले सेनेच्या मदतीने खासदार झाले तर कदाचित शिवशक्ती-भीमशक्तीची गरज राहील की नाही हे काळ सांगेल. मराठा आरक्षणासाठीज्यांनी महाराष्ट्रात अनेक आव्हाने दिली होती ते विनायक मेटे विधान परिषदेत फुकटात आमदार झाल्याबरोबर त्यांचे आंदोलन संपले. रामदास आठवले हे रामदासराहावेत, ‘सत्तेचे दासहोऊ नयेत एवढेच!

No comments: